कोकणात यंदा १ लाख ५८ हजार 'ऑलिव्ह रिडले' कासवांचे संवर्धन

Jun 20, 2024 - 16:37
Jun 20, 2024 - 16:40
 0
कोकणात यंदा १ लाख ५८ हजार 'ऑलिव्ह रिडले' कासवांचे संवर्धन

गुहागर : सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात २०२३- २४ या वर्षात आढळलेल्या २ हजार ५६६ घरट्यांमधील १ लाख ५८ हजार ८७३ पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १७ किनाऱ्यांवरून ४८ हजार ४७४ पिल्ले सोडण्यात आली. पिल्लांची आणि घरट्यांची संख्या २०२२-२३ पेक्षा दुप्पट असून पिल्लांचा जन्म होण्याचा दरही ६४ टक्के आहे.

कोकण किनाऱ्यावर 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या सागरी कासवांची घरटी आढळतात. त्यामध्ये रायगड ४, रत्नागिरी १७ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ किनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम सुरू आहे. यंदा विणीच्या हंगामात काही किनाऱ्यावर पहिल्यांदाच सागरी कासवाची घरटी आढळून आली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये, वरवडे आणि रोहिले किनाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कासव विणीच्या किनाऱ्यांमध्ये वाढ होऊन ती संख्या आता १७ झाली आहे.

यंदा कोकणातील तीन सागरी जिल्हे मिळून समुद्री कासवांची एकूण २ हजार ५६६ घरटी आढळली. त्यामधून २ लाख ४६ हजार ६०९ अंड्यांचे संवर्धन करण्यात आले. या अंड्यांमधून बाहेर पडलेल्या १ लाख ५८ हजार ८७३ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा जन्मदर अधिक आहे. २०१९ - २० ला हा जन्मदर ३५ टक्के, २०२०-२१ मध्ये ५७ टक्के आणि २०२१-२२ मध्ये ५८ टक्के आणि २०२२-२३ ला ५५ टक्के होता. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिल्लांचा जन्मदर हा रत्नागिरी आणि रायगडपेक्षा अधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा समुद्री कासवांची १ हजार ६२२ घरटी आढळली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:01 PM 20/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow