एलईडीद्वारे होणाऱ्या मासेमारीला लगाम घाला : नीलेश राणे

Jun 21, 2024 - 13:46
Jun 21, 2024 - 13:48
 0
एलईडीद्वारे होणाऱ्या मासेमारीला लगाम घाला : नीलेश राणे

रत्नागिरी : जिल्ह्याच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात एलईडीद्वारे मासेमारी सुरू आहे. आता पावसाळ्यातही अनेक ट्रॉलर्स मासेमारी करताना दिसून येत आहेत. यावर मत्स्य व्यवसाय विभागाने लगाम घालावा; अन्यथा या कार्यालयावर धडक द्यावी लागेल, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना दिले. याचबरोबर जिल्ह्यातील अन्य प्रश्नांची निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एलईडीद्वारे मासेमारी होत असल्याच्या तक्रारी असून, त्यावर योग्य कारवाई होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. एलईडीला कायद्याच्या कोणत्याच चौकटीत परवानगी नाही. मत्स्य संवर्धन कालावधीतच एलईडी फिशिंग व ट्रॉलिंग फिशिंग होत असेल तर छोट्या मच्छीमारांनी करायचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. याबाबतचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना दिले.

मत्स्य व्यवसाय खात्याने याकडे दुर्लक्ष केल्यास, या कार्यालयावर धडक देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. चिपळूण येथील पूररेषेबाबतही त्यांनी निवेदन दिले. निळ्या व लाल रेषेबाबत नागरिकांमध्ये असणारा संभ्रम लवकरात लवकर मिटला पाहिजे. लाल रेष मारण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

चिपळुणातील वाशिष्ठी नदीमधील सुमारे २१ किमीतील गाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी जवळपास ८०० ते ९०० कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून, याबाबत योग्य सर्व्हे करून त्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावा, असेही नीलेश राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सुरक्षा कामगार बोर्ड
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये महाराष्ट्र सुरक्षा कामगार बोर्डअंतर्गत १८ कर्मचारी कोरोना कालावधीपासून कामावर आहेत. या कामगारांना काढून आता नवीन कामगार भरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून, या कामगारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, सिंधुदुर्गप्रमाणेच येथील कामगारांनाही काढून न टाकता त्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 21/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow