राजापूर-लांजा कोकण पदवीधर मतदारसंघात ३ हजार ३०० मतदार

Jun 22, 2024 - 12:21
Jun 22, 2024 - 12:30
 0
राजापूर-लांजा  कोकण पदवीधर  मतदारसंघात ३ हजार ३०० मतदार

राजापूर : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महायुतीकडून विद्यमान आमदार निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीकडून अखिल भारतीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यात मुख्य लढत होणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या राजापूर उपविभागांतर्गत येणाऱ्या राजापूर व लांजा तालुक्यातून एकूण ३ हजार ३०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लांजातील तहसील कार्यालय तर राजापूर तहसील कार्यालय व पाचलमधील सरस्वती विद्यामंदिर अशी तीन मतदान केंद्रे आहेत. लांजा तालुक्यासाठी असलेले ९९ क्रमांकाच्या मतदान केंद्रांतर्गत पुरुष ९८१ व महिला ६२५ असे एकूण १ हजार ६०६ मतदार आहेत. मतदारांची संख्या पाहता लांजा तहसील कार्यालयातच मतदारयादीचे अनुक्रमे विभाजन करून सुमारे ८०० मतदारांचे एक अशी दोन मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. राजापूर तालुक्यासाठी १०० हे तहसील कार्यालय राजापूर व १०१ हे सरस्वती विद्यामंदिर पाचल अशी दोन मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी तहसील कार्यालय राजापूर या ठिकाणी पुरुष मतदार ८४६ व महिला मतदार ५५ असे एकूण १४०५ मतदार आहेत. 

राजापूर तहसील कार्यालयात देखील मतदारांची संख्या पाहता मतदारयादीचे अनुक्रमे विभाजन करून तहसील कार्यालयातच सुमारे ७०० मतदारांचे एक अशी दोन मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. राजापूर तालुक्यातील दुसरे मतदान केंद्र पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर पाचल हे आहे. या ठिकाणी एकूण मतदारांची संख्या २८९ असून यामध्ये पुरुष मतदार १९० तर महिला मतदार ९९ आहेत. या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २६) सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार असून ४ जुलैला कोकण भवन येथे मतमोजणी होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow