कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी आता AI चा वापर होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Jun 22, 2024 - 16:24
 0
कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी आता AI चा वापर होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 
मुंबई : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आता आर्टिफिशल इंटीलिजन्स म्हणजेच AI चा वापर होणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच एखादा गुन्हा सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्टिफिशल इंटीलिजन्स (AI) चा वापर होणार आहे. त्यासाठी आयआयएम नागपूरसोबत एका प्रकल्पावर काम करत आहोत. आम्ही दोघांनी एकत्रीतपणे एक कंपनी स्थापन केली आहे, ज्यामध्ये AI चा वापर केला जाईल."  

पुढे माहिती देताना फडणवीस म्हणाले की, "आज प्रमुख अधिकाऱ्यांसमोर तयार करण्यात आलेल्या मॉड्युलचे प्रेझेंटेशन झाले. त्यांनी दिलेल्या सूचनांवर काम करुन लवकरच हा प्रकल्प बाहेर आणला जाणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच एखादा गुन्हा घडला असल्यास तो सोडवण्यासाठी पूर्णपणे याचा वापर करता येणार आहे. तसेच, सीसीटीव्ही कॅमेराचे विश्लेषण करणे आणि सायबर गुन्हे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये याचा उपयोग होणार आहे. मोठ्या प्रमाणात गुन्हे सोडवणे, ट्राफिक मॅनेजमेंट या सगळ्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होणार आहे. देशातील सर्वात आधुनिक सायबर डिटेक्शन सेंटर आपण सुरु केलेले आहे. ते लवकरच सुरु होणार आहे." असेही त्यांनी सांगितले.

पोलीस भारतीबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पाऊस आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होणार आहे. अशावेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. पोलीस भरतीच्या चाचणीसाठी उमेदवार दूरवरुन येतात. त्यांना राहण्याची जागा नसल्याने ही मुले आपल्याला बस स्टॅण्डवर वैगेरे दिसतात. त्यांच्यासाठी जवळच कुठे मंगल कार्यालय अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन आम्ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या युनिट्सना दिले आहेत." अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:53 22-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow