रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट

Jun 26, 2024 - 12:27
 0
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट

मुंबई : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. कुठं मुसळधार पाऊस होत आहे, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावासाचा जोर कायम राहणार आहे. आज कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अस आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

पूर्व विदर्भात पावसाची हुलकावणी

मान्सूनच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पण पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे कोरडेच राहीले आहेत. दरम्यान, हवामान विभागाकडून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना रोज ‘येलो अलर्ट’ दिला जातो, मात्र पूर्व विदर्भात पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळं हवामान खात्याच्या या अंदाजानंतर तरी पाऊस येईल का? याची शंका शेतकऱ्यांना यायला लागली आहेत.

मुंबईत ढगाळ वातावरण राहणार

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अशंतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35°C आणि 26°C च्या आसपास असणार आहे.

चांगला पाऊस, शेतीच्या कामांना वेग

राज्यातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशा ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, ज्या भागात अद्याप चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी पेरणीसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असे, आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 30 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं राहिलेल्या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार

ISO 9001:2015 CERTIFIED

(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow