लाडकी बहिण योजना राबवणारे शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत, जयंत पाटलांचा टोला

Jul 3, 2024 - 11:11
 0
लाडकी बहिण योजना राबवणारे शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत, जयंत पाटलांचा टोला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली. खासकरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना शिंदेंनी कोपरखळ्या देखील लगावल्या.

महाविकास आघाडीच्या स्पर्धेत जयंत पाटील सर्वात पुढे आहेत, त्यामुळेच नाना पटोले फिल्डवर जाऊ लागले, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. आता जयंत पाटील यांनीही शिंदेंवर पलटवार केलाय.

काय म्हणाले जयंत पाटील?

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लाडकी बहिण योजना राबवली होती. त्या राज्यात म्हणजे मध्यप्रदेशात ती अतिशय लोकप्रिय ठरली. मात्र, ज्या शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना राबवली, त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदेंना हे माहिती आहे की नाही? हे मला माहिती नाही. या योजनेमुळे त्यांच्यावर काय संकट आहे, हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी ही योजना अजित पवारांना मांडण्यास सांगितली, असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय.

28 मंत्र्यांच्या या मंत्रीमंडळात फक्त एकच महिला मंत्री आहे

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, अजित पवार यांनी महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली. त्यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेऊन अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे सिलेंडरबाबतची त्यांची घोषणा कायम राहिली पाहिजे. मात्र महिलांवरील अत्याचाराचा आलेख वाढतोय हे गंभीर आहे. फसवेपणा किती ते बघा 28 मंत्र्यांच्या या मंत्रीमंडळात फक्त एकच महिला मंत्री आहे हे दुर्दैव असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारने मागच्या वर्षी मोदी आवास योजनेचा प्रारंभ केला. याअंतर्गत दरवर्षी 3 लाख घरकुल देणार अशी घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात फक्त 11375 घरे बांधली आहेत. आजच्या घडीला आपल्या राज्यावर 7 लाख 82हजार 991 कोटींचे कर्ज झालेले आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर जवळपास 62 हजार रुपयांचे कर्ज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow