एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

Jun 26, 2024 - 15:17
 0
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आज (२६ जून) छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, इतिहास विभागप्रमुख प्रा. पूर्णिमा सरदेसाई, मराठी विभागप्रमुख प्रा. सचिन गिजबिले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. 

यावेळी बोलताना इतिहास विभागप्रमुख प्रा. सरदेसाई यांनी आजचा दिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणूनही साजरा केला जात असल्याचे नमूद करून छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्याकडे असणाऱ्या सत्ता, संपत्ती अधिकाराचा उपयोग जनतेसाठी केला असे सांगितले. तळागाळातील लोकांना कसे पुढे आणता येईल याचा विचार करून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केल्याचे सांगितले. शिक्षणासाठी आग्रही राहतानाच त्यांनी बहुजनांना सर्वप्रकरच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न केले, असे प्रा. सरदेसाई म्हणाल्या. 

प्रा. शिंदे म्हणाले, "छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना एका समान स्तरावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना आरक्षणाचे ऊद्गाते म्हणतात. गरीब, दुर्बल घटकांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण दिले पाहिजे, ही संकल्पना त्यांनी मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याची नोंद घेतली आणि घटनेत आरक्षण दिले. छत्रपती शाहू महाराजांचे कार्य महान आहे."

प्रा. गिजबिले म्हणाले, "छत्रपती शाहू महाराजांच्या काळात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या घटकांचा समावेश दिसून येतो. त्यांच्या कालखंडातील सामाजिक जीवन आजचे सामाजिक जीवन यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्यांचे विचार आजच्या काळातही अंगिकारले पाहिजेत. त्यांना केवळ फुले वाहून नाही तर त्यांच्या पुरोगामी विचारांची पूजा केली पाहिजे." 

डॉ. जगदाळे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेतनाचा उपस्थित विद्यार्थ्यांना आजचा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणूनही साजरा केला जात असल्याचे सांगितले. आजची तरुण पिढी वाईट गोष्टींकडे प्रभावित होते आहे, हे समाजाचे चित्र आहे. विद्यार्थ्यांनी चांगले काय, वाईट काय याचा विचार करावा आणि वाईटापासून, अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पूर्णिमा सरदेसाई यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुशील साळवी यांनी केले. प्रा. वर्षा कुबल यांनी आभार मानले.  

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow