लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; AIIMS रुग्णालयात दाखल

Jun 27, 2024 - 10:08
 0
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; AIIMS रुग्णालयात दाखल

मुंबई : माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं.

लालकृष्ण अडवाणी यांना एम्सच्या जेरियाट्रिक विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अडवाणी यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.

अडवाणी यांना यावर्षी भारतरत्न प्रदान

लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अधिक अपडेट्स अद्याप समोर आलेले नाहीत. अडवाणी यांचं मेडिकल बुलेटिन एम्सचे डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञ लवकरच जारी करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, याच वर्षी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारनं देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच, भारतरत्न प्रदान केला होता.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भारतरत्न देऊन सन्मानित केलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू उपस्थित होते. अडवाणी यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

2015 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित

यापूर्वी 2015 मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं होतं. लालकृष्ण अडवाणी हे 2002 ते 2004 पर्यंत भारताचे ,सातवे उपपंतप्रधान होते. ते भाजप सह-संस्थापकांपैकी एक आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. लालकृष्ण अडवाणी 1998 ते 2004 या काळात सर्वाधिक काळ गृहमंत्री होते.

ते लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षाचे नेते आहेत. अयोध्या राम मंदिर आंदोलनात त्यांनी प्रमुख नेत्याची भूमिका बजावली होती. अडवाणींनी 25 सप्टेंबर 1990 रोजी गुजरातमधील सोमनाथ येथून पहिली राम रथयात्रा सुरू केली, जी अयोध्येत संपली. या प्रवासातून त्यांनी राम मंदिर आंदोलन लोकांपर्यंत नेलं.

दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील कराची येथे झाला. मी 12 सप्टेंबर 1947 रोजी पाकिस्तान सोडल्याचं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. त्याच्या आगमनानंतर एक महिन्यानं त्यांचं कुटुंब भारतात आलं. लालकृष्ण अडवाणी यांच्या कुटुंबात त्यांच्या कन्या प्रतिभा अडवाणी आणि त्यांचे चिरंजीव जयंत अडवाणी आहे. अडवाणींचा मुलगा आणि मुलगी दोघेही राजकारणापासून दूर आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 27-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow