कोकण पदवीधरसाठी ६५ टक्के मतदान

Jun 27, 2024 - 10:06
Jun 27, 2024 - 10:13
 0
कोकण पदवीधरसाठी ६५ टक्के मतदान

◼️१ जुलैला मतमोजणी

◼️रत्नागिरी जिल्ह्यात ६३.३५ टक्के मतदान

ठाणे : लोकसभेच्या निकालानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढविताना सोबत पुन्हा मनसेला घेतले. दुसरीकडे महाविकास आघाडीने एकत्रित प्रचार करीत निवडणुकीत चुरस निर्माण केली. त्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पदवीधर मतदार मतदानासाठी बाहेर पडले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. कोकण पदवीधर मतदारसंघात सुमारे ६५ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक ७४ टक्के मतदान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले. गतवर्षापेक्षा मतदानाचा टक्का वाढल्याने याचा फायदा कुणाला होईल, या चिंतेने सर्व उमेदवारांना ग्रासले आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्यात थेट लढत झाली. तसेच ११ अन्य अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झाले. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुमारे ६५ टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासांमध्ये ७.३० टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यन्त ५९. ३१ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक ७३. ६२ टक्के मतदान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर सर्वांत कमी ५४. २८ टक्के मतदान हे ठाणे जिल्ह्यात झाले. खरे तर या मतदारसंघात २ लाख २३ हजार २२५ मतदारांपैकी सर्वाधिक ९८ हजार मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९३१ मतदार, पालघर २८ हजार ३३३ मतदार, रत्नागिरी २२ हजार ६८६ मतदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ हजार ५५१ मतदार आहेत. या मतदारांपैकी ६५ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणी ही १ जुलै रोजी नेरुळ येथे होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ६३.३५ टक्के मतदान
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी जिल्ह्यात ३८ मतदान केंद्रांवर मतदान झाले. पाऊस असतानाही जिल्ह्यात पदवीधरांचे चांगले मतदान झाले. जिल्ह्यात ६३.३५ टक्के इतके मतदान झाले आहे. रत्नागिरीमध्ये असलेल्या मतदान केंद्राबाहेर पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात २२ हजार ६८१ पैकी १४ हजार ३६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow