राजापूर : दळे सडेवाडीमध्ये खोल टाकीत पडलेल्या वासराला जीवदान

Jul 1, 2024 - 10:38
 0
राजापूर : दळे सडेवाडीमध्ये खोल टाकीत पडलेल्या वासराला जीवदान

राजापूर : राजापूर तालुक्यातील दळे सडेवाडी सौ. सानिका लाड आणि कृष्णा लाड या उभयतांनी प्रसंगावधान राखत आणि तत्परतेने खोल टाकीत पडलेल्या वासराला टाकीच्या बाहेर काढत जीवदान दिले आहे.


सडेवाडी येथील सौ. लाड यांना आपल्या घराच्या वरच्या मजल्यावरील पार्लरच्या खिडकीमधून मागील बाजूला नवीन घराचे काम सुरू असलेल्या टॉयलेटच्या टाकीमध्ये काहीतरी तरंगताना दिसले. त्यांनी तत्काळ आपले दीर कृष्णा लाड यांना हाक मारून मागे काय आहे हे बघण्यास सांगितले. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली त्या टाकीमध्ये एक वासरू पडले होते. जीवाच्या आकांताने ते तरंगत होते. यानंतर सौ. सानिका लाड आणि कृष्णा लाड या उभयतांनी त्या वासराला टाकीच्या बाहेर काढले आणि आपल्या घरी आणून त्याला खायला दिले. सुदैवाने वासराला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नव्हती. आजुबाजूच्या परिसरातील काही लोकांना फोन करून अशा प्रकारचे वासरू कोणाचे आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कोणाचे वासरू आहे समजू शकले नाही. त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सदरील फोटोतील वासरू कोणाचे असेल तर त्यांनी लाड कुटुंबीयांशी संपर्क साधावा असा मेसेज टाकण्यात आला. त्यानंतर ते वासरू दळे शिवगण वाडीतील असल्याचे समजले. 

त्या शेतकऱ्याने सकाळी त्या वासराला ताब्यात घेतले. लाड कुटुंबीयांच्या तत्परतेमुळे एका मुक्या जीवाचा प्राण वाचल्याबद्दल कौतुक होत आहे. मात्र, शेतीचे दिवस सुरू असतानाही काहीजण आपल्या पाळीव जनावरांना मोकाट सोडत असल्याने अपघात होत असल्याने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत असून मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी होत आहे.
 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow