रत्नागिरी : जिल्ह्यात डेंगीचे १२७ रुग्ण

Jul 1, 2024 - 11:48
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात डेंगीचे १२७ रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात डेगीच्या रुग्णांचा आकडा १२७ वर पोहोचल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सर्वाधिक बाधित रत्नागिरी शहरात असल्यामुळे १५ प्रभागांत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागाचे अधिकारी नियुक्त केले आहेत.

पावसाळा सुरू झाल्यानंतर रत्नागिरी शहारातील दाटीवाटीच्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रुग्णाच्या संख्येतही वाढ झाली आहे. तापाचे अनेक रुग्ण शासकीयऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या अधिक्क आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या उपस्थितीत जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक यांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. डेंगीच्या रुग्णांमध्ये दापोली १, गुहागर ६, लांजा ५, राजापूर ११, संगमेश्वर ५, रत्नागिरी शहर ३१, मालगुंड ४, कोतवडे ७, पावस १६, चांदेराई २१, तर हातखंब्यातील १८ जणांचा समावेश आहे. डेंगीच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा, अंगणवाडी सेविका यांची संयुक्त मोहीम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाणी साचलेल्या ठिकाणी धूर फवारणी, औषध फवारणी करण्यात येणार आहे. तापाचे रुग्ण असलेल्या परिसरातील घरांमध्ये जाऊन पाहणी केली जाईल. आठवड्यातून एकदा कंटेनर रिकामे करण्यात येणार आहेत. दरम्यान, डेंगीचे सर्वाधिक रुग्ण शहरी भागात असल्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात १५ प्रभाग आहेत. त्यांच्या मदतीला आशा सेविकांची नियुक्ती केली जाणार आहे. ज्या भागात डेंगीचा रुग्ण आढळेल, तिथे आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जातील. पालिकेने शहरात ठिकठिकाणी फलक लावून प्रचार व प्रसार केला आहे. मात्र, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अनेकठिकाणी साचणारे सांडपाणी, उघडी गटारे, साचलेला कचरा यामुळे डेंगीचा प्रादुर्भाव होणाऱ्या डासांची उत्पत्ती वेगाने होत असल्याचे पुढे आले आहे. पालिकेकडून मुख्य रस्त्यावरील स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. मात्र, दाटीवाटीच्या वस्तीकडील परिसरात अपेक्षित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे डेंगीसह तापाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. शहरासह आजुबाजूच्या ग्रामपंचायतींमध्येही रुग्ण वाढत असून त्याठिकाणी आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

प्रत्यक्षात रुग्ण अधिक ?
ताप आलेल्या रुग्णांची एनएस १ ची चाचणी केली की त्यामध्ये डेंगीबाधित असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात त्यांना डेंगीसदृश लक्षणेच असतात. त्या रुग्णाच्या प्लेटलेटस्ही स्थिर असतात. ही चाचणी खासगी रुग्णालयांमध्ये होते. त्यामुळे प्रत्यक्ष डेंगीचे रुग्ण किती हे पुढे येत नाही. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात चाचणी होणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

डेंगीचे रुग्ण वाढत असत्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल होत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता, शहरी भागात प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. - डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow