Vidhan Parishad Election Result 2024 : विधान परिषदेच्या चारही जागांचा निकाल वाचा एका क्लिकवर..

Jul 2, 2024 - 12:28
 0
Vidhan Parishad Election Result 2024 : विधान परिषदेच्या चारही जागांचा निकाल वाचा एका क्लिकवर..

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT Camp) उमेदवार अनिल परब (Anil Parab) यांनी बाजी मारली.

तर शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर (Jagannath Abhyankar) यांचा विजय झाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंचाच बोलबाला दिसून आला. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने (BJP) विजयाचा गुलाल उघळला असून येथे भाजपचे निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Camp) किशोर दराडे (Kishor Darade) विजयी झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकचा गड कायम राखला आहे. पाहा A टू Z निकाल...

मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी

मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या (Mumbai Graduate Constituency) निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदान झाले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली होती. 3 हजार 422 मते अवैध ठरली होती. उमेदवाराला जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. या निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून विजयी घोषित करण्यात आले.

मुंबई शिक्षक मतदारसंघात ज. मो. अभ्यंकर यांनी मारली बाजी

मुंबई शिक्षक मतदारसंघात (Mumbai Teachers Constituency) पंचरंगी लढत झाली. या मतदारसंघात ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिंदेसेना पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे हे पाच उमेदवार रिंगणात होते. यात बाराव्या फेरी अखेर ठाकरे गटाचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मतं मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले.

कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांची विजयाची हॅटट्रिक

कोकण पदवीधर मतदारसंघात (Kokan Graduate Constituency) भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात प्रमुख लढत झाली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मतं वैध ठरली तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. उमेदवाराला जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला होता. पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मतं मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे यांना विजयी घोषित करण्यात आले. निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे सलग दुसऱ्यांदा विजयी

नाशिक शिक्षक मतदारसंघात (Nashik Teachers Constituency) शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रमुख लढत झाली. मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702 मते अवैध ठरली. उमेदवाराला जिंकून येण्यासाठी 31 हजार 576 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. किशोर दराडे हे कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 5 हजार 60 मते मिळवून विजयी झाले. किशोर दराडे हे नाशिक शिक्षक मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 02-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow