विधानसभा निवडणुकांमध्ये TET परीक्षा रखडण्याची शक्यता

Jul 3, 2024 - 11:25
 0
विधानसभा निवडणुकांमध्ये TET परीक्षा रखडण्याची शक्यता

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑफलाइन माध्यमातून घेण्यास राज्य शासनाने मार्च महिन्यात परवानगी दिली. मात्र, त्यानंतर निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जूनअखेरपर्यंत परीक्षेच्या आयाेजनाबाबत पावले उचलता आली नाहीत.

त्यात आता पुन्हा काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षा रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य परीक्षा परिषदेने यंदा टीईटी ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरवले हाेते; मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने मार्च महिन्यात ऑफलाइन परीक्षेसाठी परवानगी दिली; मात्र त्यानंतर १६ मार्च राेजी लाेकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली. मेअखेर आचारसंहिता उठताच राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे परीक्षा परिषदेला जूनअखेरपर्यंत परीक्षा एजन्सी नियुक्तीसाठी निविदा मागविणे, 'सीईटी'ची जाहिरात प्रसिद्ध करता आली नाही. त्यात सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर हाेण्याची शक्यता असून टीईटी परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

परीक्षेत पारदर्शकतेचे आव्हान

मागच्या वेळी टीईटी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा एजन्सीची नियुक्ती, प्रश्नपत्रिका फुटू नये, याबाबत दक्षता घेत पारदर्शकपणे परीक्षा व्हावी, यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

टीईटी केव्हा हाेणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

शिक्षक हाेण्यासाठी टेट परीक्षा देण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण हाेणे अनिवार्य केले आहे. राज्यात सध्या २१ हजार ६७८ पदांवर शिक्षक भरती सुरू आहे. तसेच आगामी काळातही रिक्त जागांवर शिक्षक भरती हाेऊ शकते. त्यामुळे पुढील टीईटी परीक्षा केव्हा होणार, याची अनेक उमेदवार वाट पाहत आहेत.

तीन वर्षांपासून टीईटीची प्रतीक्षाच

राज्यात नाेव्हेंबर २०२१ मध्ये ४ लाख ६८ हजार ६७९ उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली हाेती. त्यामध्ये १७ हजार ३२४ म्हणजेच ३.७० टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले हाेते. डीटीएड पदविकेस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे अर्जांवरही त्याचा परिणाम हाेऊ शकताे.

सप्टेंबरमध्ये टीईटी घेऊ

टीईटी परीक्षेच्या आयाेजनाबाबत तज्ज्ञांच्या कार्यशाळा घेत आहाेत. परीक्षा एजन्सी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर ऑगस्टमध्ये उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जातील आणि सप्टेंबरपूर्वी टीईटी घेण्यासाठी प्रयत्न करीत आहाेत. - डाॅ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow