चिपळुणात १३४ घरांना दरडीचा धोका

Jul 3, 2024 - 11:26
Jul 3, 2024 - 11:28
 0
चिपळुणात १३४ घरांना दरडीचा धोका

चिपळूण : शहरातील विविध भागांतील १३४ घरांना दरडीचा धोका आहे. त्यामुळे त्यांना स्थलांतरित होण्याची नोटीस पालिकेने यापूर्वीच दिली आहे; मात्र अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या राहण्याची व अन्य व्यवस्था योग्य नसल्यामुळे ते कुटुंबीय भीतीच्या छायेत त्या घरात राहत आहेत. शहरातील काही वस्त्या डोंगरभागात आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या सर्व्हेनुसार १३४ घरांना दरडीचा धोका असल्याचे आढळून आले. त्यामुळे पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना नोटिसा देऊन पावसाळ्यात या घरांमधून स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत; मात्र अनेकांकडे अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसल्याने ते या घरांमध्ये भितीच्या छायेखाली वास्तव्य करत आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर ते कुटुंबीय घरामध्ये बिनधास्त राहतात; मात्र पावसाचा जोर वाढला की, त्यांच्या पोटात भितीचा गोळा उठतो. त्यामुळे काहीजणं रात्रीच्यावेळी अन्य ठिकाणी झोपण्यासाठी जात असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी गोवळकोट तारा बौद्धवाडी परिसरात डोंगराचा काही भाग खचल्यामुळे १० घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रामलिंग मिसाळ, प्रदीप पारदळे, अनिल पाटणे, विजय जुबळे, सुजर खांडेकर, सागर कदम, संदीप शिगवण, दामोदर कदम, किशोर बेर्डे, अक्षय राठोड यांना दुसरी नोटीस देऊन तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या डोंगरभाग कोसळत नसला तरीही या भागात असलेली पालिकेची साठवण टाकी, गडावर जाणारी वाहने यामुळे दाब येऊन दगड व माती खाली येण्याची भीती आहे. त्यामुळे दुसरी नोटीस देण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. गेले काही दिवस तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता; मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे. आतापर्यंत ९९६.९७ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद तहसील कार्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षात झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow