चिपळुणातील उड्डाणपुलाच्या पिलरचे गर्डर तोडण्याचे काम सुरु, जुन्या कामाचा खर्च वाया

Jul 3, 2024 - 12:36
 0
चिपळुणातील उड्डाणपुलाच्या पिलरचे गर्डर तोडण्याचे काम सुरु, जुन्या कामाचा खर्च वाया

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळुणातील बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही. उलट आधी उभारलेल्या पिलरवरील गर्डरच तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे आतापर्यंत या पुलावर केलेला निम्म्याहून अधिक खर्च वाया गेल्यासारखाच आहे. पुलाच्या नव्या रचनेनुसार गर्डर तोडल्यानंतर दर २० मीटरवर पिलर उभारून मगच उड्डाणपुलाची रचना केली जाणार आहे. त्यामुळे हे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी १,८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी असून, हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून, बहादूरशेखनाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू झाले होते. मात्र, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळला.

या दुर्घटनेला नऊ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे अतिरिक्त गर्डर पिलर उभारण्याचे काम सुरू असले तरी या उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप अपेक्षित गती आलेली नाही. त्यामुळे हे काम कधी पूर्णत्वास जाणार, असा प्रश्न केला जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या आराखड्यामध्ये बदल सुचवले होते. यामध्ये सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले आहेत. त्यामधील अंतर कमी करून ते २० मीटरवर ठेवले जाणार आहेत तसेच तेथे अतिरिक्त पिलर उभारले जाणार आहेत. - आर. बी. कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow