रत्नागिरी : कुवारबावच्या घनकचरा प्रकल्पासाठी स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ नागरिकांचा उपोषणाचा इशारा

Jul 4, 2024 - 10:42
Jul 4, 2024 - 10:54
 0
रत्नागिरी : कुवारबावच्या घनकचरा प्रकल्पासाठी स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ नागरिकांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरी : शहरालगतच्या कुवारबाव ग्रामपंचायतीच्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जागेच्या प्रस्तावाला १५ महिने झाले मंजुरी दिलेली नाही. या परिसरात उघड्यावर कचरा टाकून रहिवाशांच्या जीविताशी खेळले जात आहे. म्हणून स्थानिक रहिवाशांना घेऊन १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा देणारे निवेदन ज्येष्ठ नागरिक संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

कुवारबाव ग्रामपंचायतीने २५ मार्च २०२३ ला घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या मागे ८७ गुंठे शासकीय जमीन उपलब्ध आहे, त्यापैकी काही जागा या घनकचरा प्रकल्पासाठी मिळावी असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ३१ ऑक्टोबर २०२३ ला पत्र पाठवून जागा मंजुरीचे आदेश दिले आहेत; मात्र जिल्हा प्रशासनाकडून आज १५ महिने होऊन गेले तरी त्यावर निर्णय देण्यात आलेला नाही. उलट महसूल विभागाकडून ११ जून २०२४ ला रत्नागिरी तहसीलदारांना पत्र पाठवून तांत्रिक बाबी उपस्थित करून कागदी घोडे नाचविले जात आहेत. रत्नागिरी तहसीलदारांकडून या पत्राद्वारे अभिप्राय मागवण्यात आले आहेत. महसूल खात्यामार्फत हा प्रकल्प होण्यात दिरंगाई केली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. जागा नाही म्हणून प्रकल्प नाही आणि प्रकल्प नाही म्हणून घंटागाडी नाही. घंटागाडी नाही म्हणून कचरा उचलला जात नाही आणि कचरा उचलला जात नाही म्हणून रहिवासी आणि व्यापारी दुकानदार सर्व कचरा रस्त्याच्या बाजूला आणून कचऱ्याचे डीग निर्माण करीत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन मोकाट कुत्री आणि उनाड गुरांचा उपद्रव वाढला आहे. रौप्यमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या आणि रत्नागिरी शहराचे उपनगर बनलेल्या कुवारबाव ग्रामपंचायतीच्या परिसरातील रहिवासी त्यामुळे हैराण झाले आहेत. अखेरचा उपाय म्हणून उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 04/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow