विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू : मंत्री उदय सामंत

Jul 5, 2024 - 12:03
 0
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू : मंत्री उदय सामंत

मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महायुतीकडून (Mahayuti) 9 उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ही निवडणूक होणार की सर्वांची निवड बिनविरोध होणार याचा फैसला आज होणार आहे. 12 पैकी एका उमेदवाराने माघार घेतली तरच निवडणूक बिनविरोध होईल. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपले सर्व उमेदवार जिंकून येणार असा दावा होत असताना आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर तर शेकापचे जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणी माघार घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच उदय सामंतांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कोणता उमेदवार पाडायचा ते आम्ही ठरवू

विधान परिषद निवडणुकीबाबत उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीचे सगळे उमेदवार जिंकणार आहेत. महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार आहे. कोणता उमेदवार पाडायचा ते आम्ही ठरवू, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये

टी 20 विश्वचषकातील विजेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाली. भारतीय संघाचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबईतील नरीमन पाईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत त्यांची विजयी यात्रा काढण्यात आली. विजयी यात्रेसाठी गुजरातहून बस आणण्यात आली. यावरून विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागले. यावर उद्या सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, आपले खेळाडू विरोधकांशी खिलाडू वृत्तीने कसे वागतात. हे विरोधकांनी शिकावं. 24 तासांच्या आत कार्यक्रम घ्यायचा आहे तर काय करणार? प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये, असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 05-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow