रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनिअरिंगच्या प्रस्तरारोहकांनी मनसंतोष गडावरील अजिंक्य असलेला सुळका केला सर

May 29, 2024 - 12:10
May 29, 2024 - 14:14
 0
रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनिअरिंगच्या प्रस्तरारोहकांनी मनसंतोष गडावरील अजिंक्य असलेला सुळका केला सर

रत्नागिरी : कुडाळ तालुक्यात अजून कुणीच चढाई न केल्याने अजिंक्य असणारा सुळका रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनिअरिंगच्या प्रस्तरारोहकांनी सर केला. निसटणारे दगड, पाऊस पडण्याची शक्यता यामुळे क्लाइंबिंग जरा वेळकाढू होते; पण सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेतल्यामुळे हा अजिंक्य सुळका सर करता आला, सुळका प्रथमच सर केल्यामुळे त्याचे नामकरण "मनसंतोष गडाचा बाण" असे केल्याचे अरविंद नवेले यांनी सांगितले.

अरविंद नवेले यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत संस्थेचे प्रसाद शिगवण, अमरेश ठाकुरदेसाई, मिलिंद मोरे, सिद्धेश गोरे या पाच सभासदांनी सहभाग घेतला. जिद्दीची टीम २० मे रोजी रात्री रत्नागिरीतून कुडाळकडे रवाना झाली. २१ मे रोजी पहाटे गोठवेवाडी येथील गोठवेश्वर मंदिरात थोडा वेळ आराम केला. त्यानंतर सकाळी ६.३० वा. पुरेसे पाणी भरून मनोहर गडाच्या बाजूला असलेल्या मनसंतोष गडाकडे सर्वांनी कूच केली. रात्री पडलेला पाऊस, निसरड्या वाटा, उभी चढण, पाठीवर क्लाइंबिंग साहित्याची भलीमोठी बँग यामुळे प्रवास खडतर झाला होता. त्यात भरीस भर म्हणजे पायवाटेला लागूनच असणारी मधाची पोळी, सापांचे वास्तव्य, भयंकर येणारा घाम यामुळे प्रवास जोखमीयुक्त होत होता, सकाळी ८.२० वा. टीम मनसंतोष गडाच्या पायथ्याशी पोहोचली. क्लाईबिंग करताना किती वेळ लागेल याची खात्री नसल्याने टीमने भराभर पोटपूजा करून क्लाइंबिंगचा सेटअप लावायला सुरवात केली.

सकाळी १०.१० वा. अरविंदने हा अजिंक्य सुळका चढायला सुरवात केली. तत्पूर्वी अरविंदने सुरक्षेबाबतच्या सूचना देत प्रसाद आणि सिद्धेश यांना मागोमाग कसे यायचे याचे मार्गदर्शन केले. जय भवानी जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत गणपतीला आणि सह्याद्रीला नारळ अर्पण करण्यात आला. मनसंतोष गडाची कातळभिंत आणि हा अजिंक्य सुळका यांच्यामधून खिंडीतून वरती जाण्याचा प्रयत्न अरविंदने चालू केला. पुढील १५ मिनिटांत तो पहिल्या स्टेशनजवळ पोहोचला. त्याचे अनुसरण करत प्रसादही थोड्या वेळात त्या ठिकाणी पोहोचला. पहिल्या स्टेशनपासून सुळका शिखरावर पोहोचायला खूप मेहनत घ्यावी लागली. ड्रिल मशिनने छिद्र पाडत एकूण नऊ बोल्ड सुळक्याच्या कातळभिंतीला मारण्यात आले. निसटणारे दगड, पाऊस पडण्याची शक्यता यामुळे क्लाइंबिंग जरा वेळकाढू होत होते. अथक प्रयत्नाने अरविंद १२.४५ वा. सुळक्याच्या माथ्यावरती पोहोचला. राष्ट्रीय ध्वज फडकवून त्याने आपला आनंद व्यक्त केला.

ऐतिहासिक महत्त्व
मनसंतोष गडाच्या समोर असणाऱ्या मनोहर गडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. आग्राहून सुटका झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले. तेथून रांगणा गडाला घातलेला वेढा उठवण्यासाठी महाराज ११ एप्रिल १६६७ ला या भागात दाखल झाले. रांगण्याचा वेढा उठवून १३ मे १६६७ ला महाराज मनोहर गडावर गेले. तेथे त्यांनी १५ जून १६६७ पर्यंत म्हणजे तब्बल ३४ दिवस मुक्काम केला.

माझ्यामागोमाग प्रसाद आणि सिद्धेश यांनी अजिंक्य सुळका सर केला. मनसंतोष गडाच्या बाजूला असलेला हा सुळका कुणीही सर केलेला नव्हता. जिद्दीच्या क्लाइंबर्सचे पहिले पाऊल पडले. या वेळी बेस कॅम्पचे व्यवस्थापन अमरेश आणि मिलिंद यांनी व्यवस्थित पार पाडले. जिद्दीने आतापर्यंत ट्रेकिंग, हायकिंग, क्लाइंबिंग इत्यादीमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. - अरविंद नवेले, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 29/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow