अरुण गवळीवर मोक्का लावणारी कागदपत्रं गहाळ, 10 वर्षांनंतर मुंबई पोलिसांची न्यायालयात कबुली

Jul 9, 2024 - 12:57
Jul 9, 2024 - 13:57
 0
अरुण गवळीवर मोक्का लावणारी कागदपत्रं गहाळ, 10 वर्षांनंतर मुंबई पोलिसांची न्यायालयात कबुली

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळीवर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम अॅक्ट म्हणजे मोक्का (MCOCA) लागू करण्यासंदर्भातील कागदपत्रं गहाळ झाल्याची कबुली क्राइम ब्रँचकडून मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गवळी सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे.

खंडणी, आर्थिक लाभ आणि 2005 साली मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील अनेक मालमत्ता हडप करण्यासाठी लोकांना धमक्या दिल्याचा अरुण गवळी आणि त्याच्या टोळीवर आरोप आहे. पण 2013 साली मुंबईत आलेल्या पुरात कागदपत्रं गहाळ झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गेल्या महिन्यात याच कागदपत्रांवरून न्यायालयानं पोलिसांना खडसावलं होतं. गेल्या 10 वर्षांपासून कागदपत्रांमुळं प्रलंबित असलेल्या खटल्याला आपण आणखी विलंब करू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं होतं.

मुंबईतील एका बिल्डरकडून 2005 साली राम-श्याम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी 50 लाख रूपयांची खंडणी गवळीनं मागितली होती. त्या बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचं घर असलेल्या दगडी चाळीत येण्यास सांगितलं होतं.

बिल्डरच्या तक्रारीवरून अरूण गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, धमकीसह अन्य कलमांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली गेली होती.

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात (Kamlakar Jamsandekar Murder Case) तसेच इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण नेमकं काय?

मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्यानंतर सदाशिवने गवळीच्या हस्तकांमार्फत त्यांची सुपारी दिली. प्रताप गोडसेला गवळीने या सुपारीची जबाबदारी दिली होती. याप्रकरणी आपलं नाव येऊ नये यासाठी नवे शूटर्स शोधण्यास सांगण्यात आलं होतं.

गोडसेनंनंतर श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची यासाठी निवड केली. या दोघांना अडीच-अडीच लाख रुपये देण्याचं कबुल केलं आणि अॅडव्हान्स म्हणून 20-20 हजार रुपये दिले. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालसोबत जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली. अखेरीस 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच जामसंडेकरच्या राहत्या घरी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:58 09-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow