गुहागर : पालशेत येथील किडस् लाईफ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नारळाच्या झावळांपासून बनवल्या बैठका

Jul 9, 2024 - 10:46
Jul 9, 2024 - 13:50
 0
गुहागर : पालशेत येथील किडस् लाईफ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नारळाच्या झावळांपासून बनवल्या बैठका

रत्नागिरी : लहान मुलांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, आदर व ओळख व्हावी आणि निसर्गच आपल्याला सर्वकाही देतो हे मुलांच्या मनात रुजविण्यासाठी गुहागर तालुक्यातील पालशेत येथील आयुर फौंडेशन संचलित किडस लाईफ इंग्लिश स्कूलने अभिनव उपक्रम राबवला. नारळाच्या हिरव्या झावळांपासून बैठक बनविण्याची कला विद्यार्थ्यांना शिकवण्यात आली. विद्यार्थीही या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. या बैठका आता विद्यार्थी शाळेत बसण्यासाठी वापरणार आहेत. निसर्गाशी संवाद साधत मुलांना शिकवण्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. नारळाच्या झावळांपासून पूर्वी झाप विणले जात असत. हे झाप मांडवासाठी, वाळवण वाळत घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात येत होते. मात्र आता झाप विणण्याची कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच प्लास्टिक कागदाचा वापर वाढल्याने झापाची संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे पालशेतच्या या इंग्लिश स्कूलने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी झावळांपासून तयार केलेल्या बैठका अभ्यास करताना, जेवताना, देवाची स्तोत्रे म्हणताना उपयोगात आणू शकतात. तसेच हे वापरल्यामुळे निसर्गाची हानी सुद्धा रोखू शकतो. प्लॉस्टिकचा भस्मासूर सगळीकडे होत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. त्याचा वापर हानिकारक आहे. झावळांपासून तयार केलेल्या बैठका वापरल्याने पर्यावरण संवर्धनही होणार आहे. हा उपक्रम स्कूलच्या संचालिका आसावरी वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदाने पार पडला. हा उपक्रम राबविण्यासाठी पालशेत शाखेच्या श्रीमती नार्वेकर, ओक, सौ. साळवी, वेळणेश्वरच्या शाखेच्या सौ. ठाकूर, सौ. पूजा आदींनी मेहनत घेतली.

खूप छान संकल्पना मांडली आहे. पर्यावरणपूरक नवीन संदेश देणारी आणि नावीन्यपूर्ण गोष्टींचा यातून मुलही शोध घेतील. संकल्पना खूप छान आणि खूप आवडली. असे उपक्रम राबविण्यासाठी शाळेला शुभेच्छा आणि धन्यवाद. - वीणा सैतवडेकर, पालक, पालशेत

हा उपक्रम मला खूप आवडला. यातून पारंपरिक वस्तू बनवणे ही कला जतन होऊ शकते. पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर होऊ शकतो. अनेक लोकांना यातून रोजगार मिळू शकतो. प्लास्टिकमुक्त परिसर राबविण्यासाठी ही संकल्पना खूप उपयोगी आहे. शाळेला खूप धन्यवाद देते की, लहान मुलांमध्ये तुम्ही हा उपक्रम राबवत आहात. त्यामुळे लहानपणीच त्यांना पर्यावरणाची आवड निर्माण होईल, हस्तकलेची आवड निर्माण होईल. स्नेहा हर्षद वेल्हाळ, पालक, पालशेत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow