रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार १०३ गावे हागणदारीमुक्त

Jul 9, 2024 - 14:38
Jul 9, 2024 - 14:41
 0
रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार १०३ गावे हागणदारीमुक्त

रत्नागिरी : जिल्ह्यातील १ हजार ५३३ पैकी १ हजार १०३ गावे मॉडेल झाली आहेत. उर्वरित ४३० गावे हागणदारी मुक्त अधिक मॉडल करण्यासाठी व दृष्यमान स्वच्छतेच्यादृष्टीने निरंतर प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी आपल्या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्यप्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्ह्यात सोमवारी ८ जुलैपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा, सुका निळा या नावाने अभियान राबवण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत राज्य डिसेंबर २०२४ पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृश्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करण्यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक गावात ५ संवादकांची निवड करण्यात येणार असून, हे संवादक प्रत्येकाच्या घरी जाऊन संदेश देणार आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही व बचतगटातील महिलांचा समावेश आहे. ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्यासंदर्भात तसेच नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पद्धतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय आणि नियमित वापर आदींबाबत गृहभेटीतून माहिती देण्यात येणार आहे. भेटीदरम्यान शासनाच्या गुगल लिंकद्वारे त्या कुटुंबाची फोटोसह माहिती भरण्यात येणार आहे.

तालुक्याचे गटविकास अधिकारी हे तालुक्यातील गावांच्या प्रतिकुटुंब पाच याप्रमाणे संवादक तयार करून गृहभेटीचे आयोजन करणार आहेत. दर आठवड्याला या अभियानाचा जिल्हास्तरावरून आढावा घेण्यात येणार असून ८ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान राबवण्यात येणाऱ्या ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन कीर्तीकिरण पुजार तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow