राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार

Jul 11, 2024 - 10:51
 0
राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार

मुंबई : सध्या अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुराकडे जात आहे. राज्यभरातून हजारो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. या वर्षी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी वारीत सहभागी होत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याचे ठरवले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीदेखील वारीत सहभागी होण्याचं ठरवलं आहे. ते रविवारी म्हणजेच येत्या 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत.

राहुल गांधींनी आमंत्रण स्वीकारले

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी वारीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांनी वारीत सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. गांधी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून ते पहिल्यांदाच वारीत सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूवी राहुल गांधींचा 13 किंवा 14 जुलै रोजी वारीत सहभागी होतील असे सांगण्यात येत होते. आता मात्र त्यांच्या या दौऱ्यासाठी 14 तारीख निश्चित करण्यात आली आहे.

7 जुलै रोजी अजित पवार पालखी सोहळ्यात

काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार हेदेखील वारीत सहभागी होणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील विधिमंडळातच मी वारीत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे त्यावेळी अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना टोला लगावला होता. आपल्या घोषणेप्रमाणे अजित पवार यांनी 7 जुलै रोजी पालखी सोहळ्यात हजेरी लावत टाळ घेत विठुरायाच्या नावाचा जयघोष केला होता.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या दौऱ्याला महत्त्व

दरम्यान, आगामी काही दिवसांत राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी या निवडणुकीची तयारी आथापासूनच चालू केली आहे. वेगवेगळे पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाच राहुल गांधी हे आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या या दौऱ्याला चांगलेच महत्त्व आले आहे. राहुल गांधी यांच्या या दौऱ्याचे महाराष्ट्र काँग्रेसतर्फे कसे नियोजन केले जाते? याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राहुल गांधी वारीत वारकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow