चिपळूण : बहादूरशेख येथील उड्डाणपूल कामाच्या सुरक्षेबाबत कार्यवाही करावी : प्रशांत यादव

Jul 11, 2024 - 10:58
Jul 11, 2024 - 12:00
 0
चिपळूण : बहादूरशेख येथील उड्डाणपूल कामाच्या सुरक्षेबाबत कार्यवाही करावी : प्रशांत यादव

चिपळूण : चिपळूण शहरातून बहादूर शेख ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. परंतु या पुलाच्या कामाच्या दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कमालीचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच दोन वेळा मोठे अपघात झालेले आहेत. या संदर्भात त्वरित योग्य त्या उपाययोजना कराव्यात. महामार्गाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन याबाबत भविष्यात सुरक्षेच्या बाबत काय करता येईल याची तपासणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यामध्ये या पुलाचे काम करत असताना तीन कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले होते. या अगोदर पुलाचे गर्डर कोसळून मोठा अपघात झाला होता. या दोन्ही अपघाताच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची पुरेसी सुरक्षितता आणि सुरक्षा याची उपाययोजना करण्यात आली नव्हती. कामगारांना साधे हेल्मेट किंवा सेफ्टी शूज व इतर सुरक्षिततेची साधने पुरवण्यात आली नव्हती ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे पुलाच्या एकूणच कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. या अपघाताची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आहे, असे स्पष्ट करताना प्रशांत यादव यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद केले आहे की, आम्ही कोणत्याही विकास कामांमध्ये अडथळा आणू इच्छित नाही. परंतु मानवी मूल्य आणि मानवी जीवन अत्यंत महत्त्वाचे आहे व आमच्या दृष्टीने या गोष्टीला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. कोणताही कामगार व कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका होणार नाही, अशा प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व औद्योगिक मानांकनाच्या नियमानुसार ज्या उपाययोजना करण्याच्या सूचित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व करण्यात याव्यात व यापुढे अपघात होणार नाही अशीच दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रशांत यादव यांनी केली आहे.

हा पूल अपघातानंतर रखडला आहे. परिणामी शहरातील वाहतूक ही विस्कळीत होताना दिसत आहे. हा पूल लवकर पूर्ण व्हावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी व ठेकेदार कंपनी यामध्ये कोणत्या कृती करणार आहेत याची माहिती द्यावी व आम्हाला नागरी आंदोलन उभे करण्याची वेळ येऊ देऊ नये, असा इशाराही प्रशांत यादव यांनी दिला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow