मंडणगड : वडवली, आतले, शेवरे मार्गावर ४५ वर्षांनी धावली लालपरी

Jul 16, 2024 - 13:26
Jul 16, 2024 - 14:31
 0
मंडणगड : वडवली, आतले, शेवरे मार्गावर ४५ वर्षांनी धावली लालपरी

मंडणगड : सार्वजनिक वाहतुकीचे दृष्टीने असलेल्या तालुक्यातील देव्हारे, वडवली, आतले, शेवरे मार्गे चिंचघर हा रस्ता ४५ वर्षांपूर्वी होऊन देखील या रस्त्यावरून एसटी गाडी धावत नव्हती. अखेर बोरथळ बोरीवली ही मुंबईकडे जाणारी एसटी धावल्याने तिन्ही गावांच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. वडवली, आतले, शेवरे ग्रामस्थ मंडळींनी या गावांतून मुंबई एसटी चालू करावी, यासाठी कित्येक वर्षे सतत मागणी करत होते. या गावांतून गाडी नसल्याने मुंबईला जाणाऱ्या व मुंबईवरून येणाऱ्या चाकरमानी तसेच ग्रामस्थांची खूपच गैरसोय होत होती. देव्हारे अथवा चिंचघर या गावातून खासगी वाहने किंवा पायी प्रवास करुन या गावात जाणे शक्य होत होते. सर्वांना खासगी बसने प्रवास करावा लागत असे. ग्रामीण भागातील तालुक्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी तसेच आजारी वृद्ध लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत होती. अखेर वडवली, आतले, शेवरे या तीन गावातील ग्रामस्थांनी एकजूट होऊन मंडणगड एसटी आगार प्रमुख यांच्याकडे बोरिवली बोरथळ, बोरथळ देव्हारे, वडवली, आतले शेवरेमार्गे चालू करावी, यासाठी निवेदन देण्यात आले होते.

या गावातील ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन १२ जुलैला बोरथळ-बोरिवली ही शेवरे आतले, वडवली देव्हारेमार्गे चालू करण्यात आली. लालपरीचे आगमन होताच तिन्ही गावांतील ग्रामस्थांनी गाडीचे जल्लोषाने स्वागत केले, चिंचघर ग्रामपंचायत सरपंच प्रतीक्षा लोंढे यांनी प्रथम एसटी गाडीची पूजा केली. तिन्ही ग्रामस्थ मंडळीच्या वतीने वाहन चालक शिवाजी गडदे, वाहक नाना आंबेकर यांचा शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला, श्रीफळ फोडून गाडी सोडण्यात आली. या प्रसंगी वडवली, आतले, शेवरे गावातील असंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow