तंबाखू सेवनाने २०३० पर्यंत जगात ८० लाख लोकांचा मृत्यूचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला

May 30, 2024 - 12:29
 0
तंबाखू सेवनाने २०३० पर्यंत जगात ८० लाख लोकांचा मृत्यूचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला

चिपळूण : कर्करोगासह अनेक दुर्धर आजारांना कारणीभूत असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन टाळण्याचे आवाहन चिपळूणच्या ऑन्को-लाइफ केअर कॅन्सर सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने कर्करोग, पक्षाघात/लकवा, फुप्फुसाचे आणि हृदयाचे आजार, टीबी, श्वसनसंस्थेचे विकार होतात. २०३० पर्यंत जगात ८० लाखांपेक्षा अधिक लोक तंबाखू सेवनाने कर्करोग होऊन मृत्यू होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

तंबाखूचे सेवन हे जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे आहे. जगामध्ये दरवर्षी जवळपास ६० लक्ष लोकांचा मृत्यू हा तंबाखूच्या सेवनाने होतो. यापैकी ५४ लाख लोक हे तंबाखूच्या प्रत्यक्ष वापरामुळे मरतात. ६ लाख लोक दुसऱ्या व्यक्तीने केलल्या धूम्रपानामुळे वातावरणात सोडलेल्या धुराचा प्रवेश त्यांच्या शरीरात झाल्यामुळे मरतात. तज्ज्ञांनी अभ्यासानुसार २०३० पर्यंत जगामध्ये ८० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हा तंबाखूच्या सेवनामुळे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

कर्करोग होण्यासाठी तंबाखू हा अतिशय घातक आणि कारणीभूत ठरणारा पदार्थ आहे. तंबाखू वापरणाऱ्यांपैकी ५० टक्के लोक तंबाखूच्या वापरामुळे मरतात. महाराष्ट्रात ४२ टक्के पुरुष व १९ टक्के स्त्रिया तंबाखूचा वापर करतात. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याचे जास्त प्रमाण असून वयाच्या आठव्या वर्षापासून मुले तंबाखू सेवन करतात, असा निष्कर्ष समोर आला आहे. आवाज बदलणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, खोकल्यातून रक्त बाहेर पडणे, तोंडात न भरणारी जखम होणे, न दुखणारी जखम होणे, एखादी न दुखणारी गाठ वाढणे, अनैसर्गिक रक्तस्राव होणे आदी तंबाखूतून झालेल्या कॅन्सरची लक्षणे आहेत.

तंबाखूजन्य पदार्थांमुळेच रक्तदाब वाढतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) घटते. चिपळूणच्या ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटर डॉ. अमोल पवार सांगतात की, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देणे. शरीरातील प्रत्येक अवयवामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सर होतो. म्हणून वेळीच तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच धूम्रपानाचे व्यसन टाळणे गरजेचे आहे.

तंबाखूत अतिविषारी रसायने...
तंबाखूमधील अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, अॅन्टबीन, अॅनाबेसीन अशी रसायने असून भारतीय तंबाखूमध्ये मक्र्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय आणि जठराचा कर्करोग होतो. वेळीच धूम्रपान करणं थांबवणं गरजेचं आहे. कारण तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन म्हणजे अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 30/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow