रत्नागिरीत मुख्य रस्त्याची दुरवस्था

Jul 17, 2024 - 16:02
 0
रत्नागिरीत  मुख्य रस्त्याची दुरवस्था

रत्नागिरी : शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्यामुळे वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ते खरडवून काढण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. प्रत्येक वर्षी शहरात रस्ते दुरुस्ती होत असल्यामुळे कोट्यवधींचा निधी खर्च करत पालिकेसह शासनाचे दिवाळे काढले जात आहे. पाणीयोजनेतील पाइपलाइनसह गॅसवाहिनीसाठी खोदाई, आता काँक्रिटीकरणाची अर्धवट कामे यामुळे पावसाळ्यात निर्माण होत असलेल्या रस्ता नादुरुस्तीचे दुखणे किती वर्षे सहन करायचे आणि दर्जेदार रस्ते होणार तरी कधी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे विकासाला गालबोट लावणारे ठरत आहेत.

रत्नागिरी शहरातील नागरिक मुलभूत सुविधांपासून दूरच आहेत. रस्ते आणि पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. सुधारित पाणीयोजनच्या खोदाईन दोन वर्षे रस्त्यांची वाताहात झाली. रस्त्याच्या मधून आणि बाजूने रस्त्यामध्ये चरी मारून पाईप टाकण्यात आले तेव्हा पावसाळ्यात नागरिक आणि वाहनधारकांचे हाल झाले. या खोदाईदरम्यानच सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्याची गरज होती; परंतु पुन्हा या गॅसलाईनसाठी पुन्हा खोदकाम झाले. दोन वर्षांच्या कामानी नागरिक आणि वाहनधारकांचे कंबरडे मोडले, नागरिकांची ओरड सुरू झाल्यावर शहरातील रस्ते कोट्यवधी रुपये खर्च करून गुळगुळीत करण्यात आले; मात्र हा गुळगुळीतपणा औटघटकेचा ठरला. वर्षानंतर पुन्हा या चांगल्या रस्त्यांवर वारंवार खड़े पडू नयेत यासाठी कॉक्रिटीकरणाचा ९६ कोटीचा प्रस्ताव गेला. त्याला मंजुरी मिळाली.

आता शहरात साळवीस्टॉप ते दंडा फिशरिज, नाचणे, मजगावरोड या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण मंजूर झाले. त्या कामाला सुरवात झाली. पहिल्यांदाच डांबराचा एक सिलकोट देऊन त्यावर प्लास्टिक टाकून शहरात काँक्रिटीकरण सुरू झाले. कॉक्रिटीकरण करण्यापूर्वी शहरात अनेक ठिकाणी डांबरीकरणाचा सिंगल सिलकोट टाकण्यात आला; परंतु याचा दर्जा एवढा सुमार होता की, पहिल्या पावसात म्हणजे दोन महिन्यातच हा रस्ता उखडला असून, काही भागांमध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे.

मारूती मंदिरपासून शासकीय रुग्णालयापर्यंत आणि जेलनाक्याजवळील रस्त्याचा बारीक रेवा सुटल्याने यावरून कसरत करत करत वाहने चालवावी लागत आहेत. मुख्य रस्ता रस्ता एवढा खराब झाला आहे की, जेसीबीने तो खरडवून काढण्यात आला. आठवडा बाजारात गेलात तर वाहन नेमके चालवायचे कुठून, असा प्रश्न पडतो. पावसाच्या नावाखाली केवळ डबर भरून हा प्रश्न सुटणार नाही. कॉक्रिटीकरण पूर्ण होईपर्यंत आहे ते रस्ते तरी सुधारा, अशी नागरिकांची आग्रहाची मागणी आहे. सोशल मीडियावरदेखील रस्त्यांच्या या दुर्दशेबाबत उपहासात्मक चर्चा सुरू आहे.

शहरात कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात खड्डे पडण्याचा प्रश्न सुटेल. मात्र, आता पडलेले खड्डे हे पावसाची उघडीप मिळाली की, लगेच कोल्डमिक्सने भरून घेतले जातील. - तुषार बाबर, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका

खड्याच्या ठिकाणी ट्रकभर चिरे ठेवा
शहरातील रस्ते एवढे खराब झाले आहेत की, वाहने चालवायची कशी, असा प्रश्न पडतो. पालिका प्रशासनाने ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी चिऱ्याचा एकेक ट्रक आणून टाकावा म्हणजे दररोज खड्डे भरण्यास सोपे जाईल, अशी कोपरखळी मनसेचे पदाधिकारी छोटू खामकर यांनी लगावली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:28 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow