चिपळूण : परशुराम घाटात 'विसावा पॉईंट'चे सुशोभीकरण

May 30, 2024 - 15:30
May 30, 2024 - 15:47
 0
चिपळूण : परशुराम घाटात 'विसावा पॉईंट'चे सुशोभीकरण

चिपळूण : .... भले बुरे ते घडून गेले... विसरून जावे सारे क्षणभर... जरा विसावू या वळणावर...! असे मराठीत गाणे आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अशाच एका वळणावर निळाशार वाशिष्ठीचे विहंगम दृश्य दिसते आणि प्रत्येकालाच या वळणावर विसावा घ्यावासा वाटतो. चौपदरीकरणानंतर आता या वळणावर विसावा घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने खास व्यवस्था केली असून, जुन्या रस्त्याने जाऊन आपल्याला या शांत ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेता येतो.

जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर विसावा पॉईंट कोकणात येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होता. आता चौपदरीकरणामध्ये नव्याने या पॉईंटची रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने बसण्यासाठी बाकडे, चिरेबंदी पादचारी पथ तयार करण्यात येत आहे. लवकरच या ठिकाणी झाडेझुडपे आणि शोभिवंत झाडांची लागवड केली जाणार असून, बाग तयार केली जाणार आहे. या ठिकाणी असलेल्या संरक्षक भिंतीवर समोरून दिसणारे वाशिष्ठीचे विहंगम दृश्य चित्रकाराने चितारले आहे. त्याच पद्धतीने श्री परशुराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. तसेच वाशिष्ठी नदीतून होडी घेऊन जाणारा नावाडी, मगर अशी चित्रे या ठिकाणी साकारण्यात आली आहेत. चौपदरीकरण केलेल्या रस्त्यावरून जाणारा हा विसावा पॉईंट सहसा प्रवाशांच्या निदर्शनास पडत नाही. मात्र, ज्यांना निसर्गाची आवड आहे, ते इथे भेट देतात.

निसर्गाचे विहंगम दृश्य
जुना डांबरी रस्ता नव्याने करून त्या ठिकाणी हा विसावा पॉईंट विकसित करण्यात आला आहे. खेडकडे जाताना परशुराम घाटात डाव्या हाताला जुना रस्ता जातो. त्या रस्त्याने वरती गेल्यावर विकसित होणारा विसावा पॉईंट आणि पुढे गेल्यावर जुना पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पोहोचल्यावर समोरील विहंगम दृश्य पाहून मन तृप्त होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 30/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow