'मी जेव्हा सिनेमा काढेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील', फडणवीसांचा 'धर्मवीर-२'च्या निमित्ताने इशारा

Jul 22, 2024 - 14:17
 0
'मी जेव्हा सिनेमा काढेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील', फडणवीसांचा 'धर्मवीर-२'च्या निमित्ताने इशारा

मुंबई : मलाही सिनेमा काढायचा आहे. त्याला अजून वेळ आहे. मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्यवेळ आली तर सिनेमा काढेनच, असा सूचक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

'धर्मवीर' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या 'धर्मवीर २' चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी लाँच करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित भव्य सोहळ्यात 'धर्मवीर २' चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सलमान खान, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, गोविंदा, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, बमन इराणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, दिग्दर्शक महेश कोठारे, जितेंद्र, मंगेश देसाई, प्रसाद ओक, झी समूहाचे एमडी आणि सीईओ पुनीत गोएंका, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मंडळी उपस्थित होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, हीच आमच्या सरकारचीही टॅगलाईन आहे. 'धर्मवीर' सिनेमाने तो काळ जिवंत केला. या सिनेमाने अनेकांना प्रेरणा दिली. हा सिनेमा आला तेव्हा याचा दुसरा भाग येईल असे कोणाला वाटले नव्हते. या सिनेमा प्रमाणेच शिंदे यांचाही दुसरा भाग सुरू आहे. दिघेसाहेबां प्रमाणेच शिंदे यांनाही विचारांशी गद्दारी मान्य नव्हती. म्हणून ते बाहेर पडले. विचारांशी गद्दारी करणाऱ्यांची साथ सोडून पुन्हा एकदा नैसर्गिक युती करत मुख्यमंत्री म्हणून समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विचारांची गद्दारी अमान्य करणारे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोघेही एकनाथ शिंदे यांना स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. धर्मवीर दोनचा ट्रेलर पाहिला. या सिनेमात केवढा काळ चित्रित केला आहे, माहित नाही. पण आतापर्यंतचा काळ असेल तर त्यात आमचाही थोडा रोल असायला हवा, असे मिश्किल विधानही देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतरच मलाही सिनेमा काढायचा आहे. त्याला अजून वेळ आहे. मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्यवेळ आली तर सिनेमा काढेनच, असा सूचक इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow