शीळ जॅकवेलच्या पाईपलाईनसाठी निधीची गरज : हनिफ काझी

May 31, 2024 - 10:44
May 31, 2024 - 11:12
 0
शीळ जॅकवेलच्या पाईपलाईनसाठी निधीची गरज :  हनिफ काझी

राजापूर : गेली कित्येक वर्षे राजापूरकरांना कोदवली येथील नवीन धरणाचे गाजर दाखवून २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले जात आहे; मात्र अजून दहा कोटी रुपये जरी खर्च केले तरी राजापूर शहरवासीयांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उद्योजक किरण सामंत यांना राजापूरकरांना पाणी द्यायचे असेल तर या धरणाऐवजी शीळ जॅकवेलकडून समांतर पाणीपुरवठा वाहिनीसाठी निधी द्यावा आणि ते काम मार्गी लावावे, असा टोला माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी लगावला.

पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई अशी राजापूरची अवस्था आहे; मात्र आजही राजापूर शहर सायबाच्या धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. नगरपालिकेच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राजापूरकरांना २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले जाते; मात्र ते प्रत्यक्षात पूर्ण होत नाही. नव्या धरणाचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. उद्योजक किरण सामंत यांनी या धरणाच्या कामाची पाहणी करून उर्वरित निधी देण्याचे आश्वासन दिले. त्याबाबत काझी यांनी सामंत यांना राजापूरवासीयांना २४ तास पाणी द्यावयाचे असेल तर शीळ जॅकवेलकडून शहरात साठवण टाकीत येणाऱ्या पाण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन मंजूर करावी व त्यासाठी निधी द्यावा. कोदवली धरण हे केवळ राजकीय गाजर झाले असून, या निवडणुकीत धरणाच्या कामाचे राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांना नक्कीच राजापूरकर धडा शिकवतील, असाही टोला त्यांनी लगावला.

रखडलेल्या कामात मुरतंय पाणी
कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या रखडलेल्या कामातच पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त येत असून, धरणाच्या झालेल्या या कामाची  चौकशी होणे गरजेचे आहे. ही मागणी करण्यासाठी एका शिष्टमंडळासमवेत पालकमंत्री उदय सामंत आणि  उद्योजक किरण सामंत यांची लवकरच भेट घेऊन त्यांच्याकडे पुराव्यासह कैफियत मांडणार असल्याचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 31/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow