रत्नागिरी : हरचेरी, पोमेंडी, टेंबेपूल, तोणदे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची महावितरणवर धडक

Jul 25, 2024 - 10:16
Jul 25, 2024 - 10:21
 0
रत्नागिरी : हरचेरी, पोमेंडी,  टेंबेपूल, तोणदे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची महावितरणवर धडक

रत्नागिरी : तीन महिने विजेच्या लपंडावाने त्रस्त असलेल्या पोमेंडी, टेंबेपूल, तोणदे, हरचेरी पंचक्रोशीतील संतप्त वीज ग्राहकांनी बुधवारी महावितरणच्या नाचणे पॉवरहाऊस येथील कार्यालयावर धडक दिली. साहेब एसीत बसून मस्त, जनता मात्र त्रस्त, अशा घोषणा देत अधिकाऱ्यांना दालनाबाहेर बोलवून प्रवेशद्वारावर चर्चा केली. यापुढे या भागातील लाईट गेला तरी महावितरणच्या एकाही कर्मचाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. जोडणी तोडायला आलात तर विद्युत खांबाला बांधून ठेवू, असा खणखणीत इशारा ग्रामस्थांनी दिला.

रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी, हरचेरी, चिंचखरी, टेंबे, सोमेश्वर, तोणदे आदी भागातील विद्युत ग्राहकांना गेल्या तीन वर्षांपूर्वी कुवारबाव उपकेंद्रातून विद्युत पुरवठा होत होता. परंतु त्यानंतर हा विद्युत पुरवठा पानवल उपकेंद्रातून करण्यात आला. मात्र, तेव्हापासून पावसाळ्यात या भागातील वीज ग्राहकांना वारंवार खंडित विद्युत पुरवठ्याचा सामाना करावा लागत आहे. गेली तीन महिने हे ग्राहक विजेच्या या खेळखंडोब्याला तोंड देत आहेत.

वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. दोन ते तीन दिवस लाईट येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेल्या या पंचक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांची सहनशिलता संपली आणि काल जमावाने महावितरणच्या नाचणे कार्यालयावर धडक दिली.

या आंदोलनाचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र झापडेकर यांनी केले. ग्रामस्थांच्या वतीने बंड्या साळी यांनी अधिकारी साळवी यांच्याशी चर्चा केली. गेली तीन महिने नागरिक वारंवार होणाऱ्या विद्युत पुवठ्यामुळे हैराण आहेत.

पानवल उपकेंद्रावरून वारंवरा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे तत्काळ या भागाला पूर्वी प्रमाणे कुवारबाव उपकेंद्रावरून विद्युतपुरवठा करावा, दरवर्षी पाण्यात जाणाऱ्या डीपीची उंची वाढवावी, तसेच तेथील महावितरणचे कर्मचारी केळकर यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ते कोणाचे काही एकत नाही. त्यामुळे त्याची पहिली बदली करावी आणि जोवर कुवारबाव उपकेंद्रातून विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही, तोवर विनाखंडित विद्युतपुरवठा या भागातील ग्रामस्थांना करावा, असे लेखी आश्वासन तुम्ही द्यावे, अशी मागणी केली.

हरचिरी जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांचा प्रश्न वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आला होता. परंतु अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाल्यानेच बुधवारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ महावितरण कार्यालयावर धडकले. दिलेल्या आश्वासनानुसार चार दिवसांत प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. - महेंद्र झापडेकर, माजी जि.प. सदस्य, हरचेरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow