खेडमध्ये पूर ओसरला, जगबुडी अद्याप इशारा पातळीवर

Jul 27, 2024 - 09:58
Jul 27, 2024 - 10:02
 0
खेडमध्ये पूर ओसरला, जगबुडी अद्याप इशारा पातळीवर

खेड : शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात देखील पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु जगबुडी नदी मात्र अद्याप इशारा पातळीवरून वाहत असून, येत्या चोवीस तासांमध्ये हवामान खात्याने पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्याने नागरिक सतर्क आहेत. बाजारपेठेत गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पुराचे पाणी होते; परंतु आता पूर ओसरला असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गेल्या २४ तासांत खेडमध्ये १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

खेड शहरात गुरुवारी (दि. २५) मुसळधार पाऊस पडल्याने जगबुडी व  नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शहराला पुराचा फटका बसला.

बाजारपेठ, गांधी चौक, निवाचा चौक, सफा मशिद चौक आदी भागांसह बंदर परिसरात पुराचे पाणी शिरले होते. खेड - दापोली मार्ग नाना नानी पार्क येथे पुराचे पाणी शिरल्याने वीस तासांपेक्षा जास्त काळ रहदारीसाठी बंद होता. शुक्रवारी दि.२६ रोजी पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांमधील पाण्याची पातळी देखील कमी झाली आहे. जगबुडी नदी ६ मीटरवरून वहात असून पूर ओसरला आहे. शहरात आ. योगेश कदम यांनी रात्री अधिकाऱ्यांसोबत पूर परिस्थितीची पाहणी करून आवश्यक सूचना केल्या.

सकाळी पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान खात्याने 'रेड अलर्ट' दिला असल्याने सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बाजारपेठेतही अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे गर्दी कमी होती. गेल्या पंधरा दिवसांत सहा वेळा खेडमध्ये नद्यांनी पूररेषा गाठल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. त्यात दररोज दुकानातील साहित्य उचलून ठेवावे लागत आसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पूरस्थितीत अस्मानी संकट कोसळलेले असताना गत वर्षी शासनाने पंचनामे करूनही केवळ २० टक्के लोकानांच मदत मिळाली असून, उर्वरित मदतनिधी च सरकारने न दिल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow