पाकिस्तानमध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी दोन आदिवासी समुदाय भिडले, 49 लोकांचा मृत्यू

Jul 30, 2024 - 13:37
Jul 30, 2024 - 14:37
 0
पाकिस्तानमध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी दोन आदिवासी समुदाय भिडले, 49 लोकांचा मृत्यू

भारताचा शेजारील देश पाकिस्तान सध्या दंगलीच्या आगीत होरपळत आहे. जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी दोन आदिवासी समुदायांमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. खैबर पख्तूनख्वा भागात झालेल्या दंगलीत आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू, तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. या दंगलीत क्षेपणास्त्रे, मोर्टार, रॉकेट आणि स्वयंचलित तोफाही वापरल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पाच दिवसांपूर्वी जमिनीच्या वादावरुन दोन समुदयांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीचे रुपांतर दंगलीत झाले अन् पेवार, टांगी, बालिशखेल, खार काले, मकबाल, कुंज अलीझाई, पारा चमकनी आणि करमनसह अनेक भागात ही दंगल पसरली. या दरम्यान, दोन्ही बाजूने एकमेकांवर क्षेपणास्त्रे, मोर्टार, रॉकेट लॉन्चरसह अनेक शस्त्रांचा मारा करण्यात आला. 24 जुलैपासून सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत 49 जणांनी जीव गमावला असून, 200 हून अधिक जखमी आहेत.

हिंसाचार का भडकला?
पाकिस्तानातील या दंगलीमागे जमिनीचा तुकडा असल्याचे सांगितले जात आहे. गुलाब मिल्ली खेल आणि मिडगी कुल्ले, या आदिवासी समुदायांमध्ये 30 एकर जमिनीसाठी अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. गुलाब मिली खेळ शिया समुदायाचा आहे, तर मिदागी कुल्ले खेल सुन्नींचा आहे. गेल्या वर्षी जुलैमध्येही याच जमिनीच्या तुकड्यावरुन वाद झाला होता. त्यावेळी कुर्रममध्ये झालेल्या जातीय संघर्षात अर्धा डझनहून अधिक लोक मारले गेले. आता पुन्हा एकदा खैबर पख्तूनख्वा भागातील कुर्रम जिल्ह्यात असलेल्या जमिनीच्या तुकड्यासाठी दोन आदिवासी समुदायांमध्ये संघर्ष पेटला आहे.

सध्या सर्व शाळा, महाविद्यालये बंद
गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष पुन्हा पेटल्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था आणि बाजारपेठा तात्काळ बंद ठेवण्यात आल्या असून, मुख्य रस्त्यांवरील वाहतूकही दिवसभर बंद ठेवण्यात आली आहे. दंगलग्रस्त भागात पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow