Wayanad landslides : वायनाड भूस्खलनात १५६ जणांनी गमावला जीव; अनेकजण बेपत्ता

Jul 31, 2024 - 12:20
 0
Wayanad landslides : वायनाड भूस्खलनात १५६ जणांनी गमावला जीव; अनेकजण बेपत्ता

वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या घटनेत आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून अनेकजण बेपत्ता असून आहेत. अजुनही या ठिकाणी मदत मोहिम सुरूच आहे, गेल्या काही दिवसापासून वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.

दरम्यान, आता वायनाडमधील वाढता पाऊस आणि भूस्खलनासारख्या घटना का घडत आहेत यावर एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी भाष्य केले आहे. या घटनांमागील कारणही त्यांनी सांगितले आहेत.

केरळमध्ये सुरू असलेला अधिक पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना याचे कारण अरबी समुद्रातील वाढते तापमान असल्याचे कारण त्यांनी सांगितले.

वरिष्ठ शास्त्रज्ञ एस अभिलाष यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या सगळ्यांची कारणे सांगितली आहेत. एस अभिलाष हे कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वातावरणीय रडार संशोधन केंद्राचे संचालक आहेत. ते म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यांपासून कासारगोड, कन्नूर, वायनाड, कालिकत आणि मलप्पुरम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

'२०१९ मध्ये असेच ढग तयार झाले होते'

" गेल्या दोन आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. यामुळे माती जड झाली. २९ जुलै रोजी अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ खोल 'मेसोस्केल क्लाउड सिस्टिम' तयार झाली होती. यामुळे मुसळधार पाऊस झाला आणि नंतर भूस्खलन झाले. २०१९ मध्ये केरळमध्ये पूर आला होता त्यावेळीही असेच ढग तयार झाले होते. काहीवेळा असं किनाऱ्याकडे होतं. २०१९ मध्येही असेच घडले होते. 'दक्षिण-पूर्व अरबी समुद्र गरम होत आहे, यामुळे केरळसह या भागातील वातावरण अस्थिर होत आहे,असं आमच्या संशोधनात असे आढळून आले आहे, असंही वरिष्ठ शास्त्रज्ञ एस अभिलाष म्हणाले.

कर्नाटक, कोकणातही परिणाम

एस अभिलाष यांनी सांगितले की, हा बदल हवामान बदलाशी देखील संबंधित आहे. पूर्वी असा पाऊस मंगळुरू जवळील 'उत्तर कोकण पट्ट्यात' अधिक प्रमाणात होत होता. २०२२ मध्ये, अभिलाष आणि इतर शास्त्रज्ञांचे संशोधन हवामान आणि वातावरणीय विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानुसार, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस अधिक वेगाने सरकतो. अभिलाष आणि आयआयटीएम आणि आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी २०२१ मध्ये एल्सेव्हियरमध्ये प्रकाशित केलेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोकण प्रदेशातील अतिवृष्टीचे एक हॉटस्पॉट दक्षिणेकडे सरकले आहे. ज्याचे संभाव्य परिणाम घातक असू शकतात.

भारतीय हवामान विभाग हवामान केंद्रांनी त्रिशूर, पलक्कड, कोझिकोड, वायनाड, कन्नूर, मलप्पुरम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांमध्ये १९ सेमी ते ३५ सेमी दरम्यान पावसाची नोंद केली आहे.

केरळसह महाराष्ट्रातही कमी वेळात जास्त पाऊस

हवामान विभागाने १ ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला. केरळमधील काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिला. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे, मान्सूनची पद्धत अनियमित झाली आहे आणि कमी कालावधीत जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे केरळपासून महाराष्ट्रापर्यंतच्या पश्चिम घाटात दरड कोसळण्याच्या आणि पुराच्या घटना वारंवार घडत आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 31-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow