चिपळूण : पेढेत एसटी बस सर्विस रोडवरून धावत नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची गैरसोय

Jul 31, 2024 - 10:09
Jul 31, 2024 - 15:11
 0
चिपळूण : पेढेत एसटी बस सर्विस रोडवरून धावत नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची गैरसोय

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील फरशी तिठा येथे दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड पूर्ण असूनदेखील एस. टी. महामंडळाच्या गाड्या सर्विस रोडवरून न धावता चौपदरीकरण केलेल्या रस्त्यावरून धावत आहेत. यामुळे पेढेमधील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. महामार्गावरच विद्यार्थी उभे राहात असल्याने या ठिकाणी अपघात घडण्याचा धोका आहे. त्यामुळे तातडीने एस.टी. गाड्या सर्व्हिस रोडने सोडण्यात याव्यात, अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.

पेढे येथे ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल तर आर. सी. काळे हायस्कूल व महाविद्यालय आहे. या शाळांमध्ये अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. परशुरामपासून ते वालोपेपर्यंत तसेच गोवळकोट, पेठमाप येथील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. या शिवाय लोटे एमआयडीसीकडे जाणाऱ्या लोकांसाठी पेढे येथील एसटी थांबा महत्त्वाचा असतो. या ठिकाणचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. तसेच सर्व्हिस रोडदेखील पूर्ण करण्यात आले आहेत. परंतु सर्व्हिस रोडवरून येथील एस.टी.ची वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. या ठिकाणी काँक्रिटीकरणच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना घडण्याचा धोका आहे. संबंधित शिक्षण संस्था, पेढे ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, एस.टी. आगार व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब का येत नाही? याची तत्काळ दखल घ्यावी आणि पेढे येथील दोन्ही सर्व्हिस रोडवरून एस.टी. च्या लोकल फेऱ्यांची वाहतूक तातडीने सुरू करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow