चिपळूण ते रत्नागिरी मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका; महामार्गाची दुरवस्था

Aug 1, 2024 - 11:31
Aug 1, 2024 - 12:39
 0
चिपळूण ते रत्नागिरी मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका; महामार्गाची दुरवस्था

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे; परंतु महामार्गावरील चिपळूण ते रत्नागिरीदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे तर काही ठिकाणी रस्ते खचण्याची भीती वाहनचालकांना आहे. महिन्याभरानंतर येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे, महामार्गांच्या उभारणीबाबत त्यांच्या दृष्टिकोनाचे नेहमीच कौतुक होते; मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे या कामाला दृष्ट लागली आहे. 

या मार्गावरील खड्ड्यांतून प्रवास करताना प्रवाशांच्या तोंडात वारंवार गडकरींचेच नाव येते. महामार्गावर आरवलीपासून पुढे चौपदरीकरणाचे काम उशिराने हाती घेण्यात आले. आरवली ते हातखंबा या दरम्यान एकेरी मार्ग पूर्ण झालेला नाही. दुसऱ्या मार्गाचे काम सुरू आहे. 

खेरशेत, आरवली, धामणी, कडवई फाटा, तुरळपासून अगदी हातखंब्यापर्यंत खुला चौपदरीकरणासाठी डोंगर फोडण्यात आले आहेत या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. खड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे मोठे दिव्य ठरत आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे चाकरमान्यांचा रोष कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण महामार्गाच्या पाहणीसाठी आले होते. चाकरमान्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षीही असाच बैठकांचा फार्स केला होता. तरीही खड्ड्यांतूनच प्रवास करत गणेशभक्तांना कोकणात जावे लागले होते.

आश्वासन हवेत विरले
गेल्या वर्षी महामार्ग पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी आठ दौरे केले होते. त्या दौऱ्यांत त्यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका लेनचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते; मात्र ते हवेतच विरले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जूनअखेर महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन लोकसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. या निवडणुका संपून बराच काळ झाला तरीही महामार्ग पूर्ण झालेला नाही. त्यामुळे खड्ड्यांतील प्रवास चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांच्या नशिबी कायम आहे.

जूनच्या सुरवातीलाच मुंबई-गोवा महामार्गाची खड्यामुळे चाळण झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर एक फूट खोलीचे आहेत. महामार्गाची दुरवस्था झाल्याने अपघात वाढले आहेत. खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच काही ठिकाणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. - संदीप सावंत, माजी तालुकाप्रमुख, शिवसेना

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow