Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधी फक्त 1 रुपयाच जमा होणार

Aug 1, 2024 - 12:30
 0
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधी फक्त 1 रुपयाच जमा होणार

मुंबई : राज्य सरकारच्या (State Government) वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा करण्यात आली. या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी गावा-खेड्यांसह शहरांतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

अशातच आता रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्र जमा केले जाणार आहेत. त्यासाठी तांत्रिक पडताळणीला सुरुवात झाली आहे. अशातच काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रायोगित तत्त्वावर प्रत्येकी एक रुपया जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा केवळ तात्रिक प्रक्रियेचा भाग असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका, असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये बोलताना ते म्हणाले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत खूप अर्ज येत आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं, हे आमच्यासाठी निश्चितपणानं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रायोगित तत्त्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रत्येकी एक रुपया जमा करत आहोत. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक पडताळणी प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे. ही पडताळणी सुरू झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी सुरळीत होण्यासाठी निश्चितपणानं मदत होणार आहे. अर्जदार माता-भगिनींना आमची विनंती आहे की, हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबाबतचा कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्या प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका."

निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार : अदिती तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला आणि बालविकास विभागाकडे 1 कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार आहोत. हा 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला आणि गैरसमजाला बळी पडू नये, असं आवाहन करते.

अर्ज भरण्याची मुदत आता 31 ऑगस्टपर्यंतच

महाराष्ट्र सरकारनं 2024-25 चा आर्थिक अर्थसंकल्प सभागृहात सादर करताना राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024' जाहीर केली. त्याद्वारे राज्यातील महिलांना 18 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना दरमाहा आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गावागावंत महिलांनी मोठी गर्दी केली. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारनं लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 01-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow