अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंना मुख्य आरोपी करा; अजित पवार गटाची मागणी

Aug 1, 2024 - 17:01
Aug 1, 2024 - 17:15
 0
अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंना मुख्य आरोपी करा; अजित पवार गटाची मागणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण चांगलंच तापले आहे. तसेच या प्रकरणी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना मुख्य आरोपी करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, हत्यारे घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. म्हणून त्यांची गाडी फोडली. सर्वसामान्य नागरिकांवर असा प्रसंग यायला नको, परंतु विधिमंडळाच्या सदस्याच्याबाबतीत असा प्रसंग येत असेल तर ही चिंतनीय बाब आहे. या प्रकाराला प्रोत्साहन देणारे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना मुख्य आरोपी करावे. या हल्ल्यातील आरोपी जय मालोकर या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूला राज ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोपही उमेश पाटील यांनी यावेळी केला.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 'राडा संस्कृती' निर्माण केली आहे त्यामुळे तरुणपिढी बेरोजगारीकडे जास्त झुकली आहे. या सर्व प्रकाराला आणि तरुणांची बेरोजगार फौज तयार करण्याला राज ठाकरे जबाबदार आहेत, असा दावाही उमेश पाटील यांनी केला.

राज ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने संतप्त मनसे सैनिकाने आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. मात्र त्यानंतर त्या तरुणाचा जीव गेला. आपल्या एका कार्यकर्त्यांला जीव गमवावा लागला असताना मनसेच्या कार्यकर्त्यांना अक्कल येत नाही, उलट आमदार अमोल मिटकरी यांना कुत्र्यासारखं मारण्याची भाषा करत आहेत. राज ठाकरे यांच्या घरात कुत्रा होता त्याला ते मारत असल्याने त्या कुत्र्याने घरातील व्यक्तीचा चावा घेतला. असा दावा करतानाच महाराष्ट्रात जेवढी कुत्र्यांची संख्या आहे तेवढी संख्याही तुमच्या कार्यकर्त्याची नाही, अशी बोचरी टीका उमेश पाटील यांनी केली.

एका कार्यकर्त्यांला हल्ला करायला प्रवृत्त करणे आणि त्यात त्या तरुणाचा मृत्यू होणे हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. कायदा हा सर्वांना सारखा आहे त्यामुळे राज ठाकरे यांना कायदा वेगळा नाही त्यामुळे तसा गुन्हा तात्काळ दाखल करावा अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेश पाटील यांनी केली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 01-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow