रत्नागिरी : जिल्ह्यातील मातोश्री पाणंद रस्ते कागदी लढाईत अडकण्याची शक्यता

Aug 3, 2024 - 16:29
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील मातोश्री पाणंद रस्ते  कागदी लढाईत अडकण्याची शक्यता

रत्नागिरी : ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या अडचणी लक्षात घेता मातोश्री पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५६४ पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो किलोमीटरचे रस्ते होणार असले, तरी त्या रस्त्यांची कामे करण्यासाठी शेजारच्या शेतकऱ्याने किंवा जागा मालकाने रस्ता रुंदीकरणासाठी जमीन देणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत सकारत्मकता नसल्याने जिल्ह्यात ही योजना कागदी लढाईतच अडकण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी वहिवाटी असणारे पाणंद रस्ते महत्वाचे आहेत. या रस्त्यांची जिल्ह्यात कामे मंजूर करण्यात आली असली, तरी शेजारी असलेल्या जमीन मालकाचा कामासाठी असलेला अडथळा या कामात अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याची कामे रखडण्याची शक्यताच अधिक आहे.

शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा, या दृष्टीकोनातून 'मी समृद्ध तर गाव समृद्ध' या योजनेत पाणंद रस्त्यांची संकल्पना मनरेगातून राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेतरस्ते तयार करण्यासाठी मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना राबिवण्यात येत आहे. शेतापर्यंत रस्ता नेण्यासाठी मातोश्री शेत पाणंद रस्त्यामधून जिल्ह्यात ५६४ रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. कामे मंजूर करण्यात आलेली असली, तरी एकही काम झालेले नाही. रस्त्यासाठी कोणीही जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे जमीनीचे कागदी घोडेच या योजनेत आतापर्यंत नाचत आहेत. ही कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री शेत पाणंद रस्त्याच्या माध्यमातून करण्यात येणार होती. जिल्ह्यात पाणंद रस्त्याच्या मंजूर कामांपैकी न होणाऱ्या कामांची संख्या १८२, तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले कामांचे प्रस्ताव ७१, कार्यवाही न केलेल्या कामांची संख्या ३०६ आणि तांत्रिक मान्यता देण्यात आलेली कामे ५ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेली ही योजना शेतकऱ्यांच्याच अडचणीमुळे प्रत्यक्षात येताना अवघड झाली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:58 PM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow