संस्कार आणि विचारांचे बळ देण्याचे सामर्थ्य पुस्तकातच : प्रा. एस. व्ही. निंबाळकर

Aug 13, 2024 - 10:49
Aug 13, 2024 - 11:50
 0
संस्कार आणि विचारांचे बळ देण्याचे सामर्थ्य पुस्तकातच : प्रा. एस. व्ही. निंबाळकर

त्नागिरी : संस्कार आणि विचारांचे बळ देण्याचे सामर्थ्य पुस्तकातच असून अशा पुस्तकांचे वाचन करून वाचन संस्कृती आपण जपू या, असे आवाहन प्रा. एस. व्ही. निंबाळकर यांनी केले.

पाचल (ता. राजापूर) येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयात ग्रंथालय विभागाने आयोजित केलेल्या डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती आणि ग्रंथपाल दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, आज वाचन संस्कृती वाचवण्याची गरज असून त्यासाठी तरुणाईने पुढे येण्याची गरज आहे. एके काळी मौखिक परंपरेने शिक्षण दिले जात होते. त्यामुळे सारे ज्ञान मौखिक परंपरेने जपले जात होते. नंतर वाचन संस्कृती अस्तित्वात आली. पुस्तक आणि ग्रंथालयांची संख्या वाढली. त्या प्रमाणातच वाचनाकडे लोकांचा कल वाढला आणि लोक ग्रंथालयाकडे वळू लागले. आज या वाचकांची संख्या रोडावली असून ग्रंथालये ओस पडत आहेत. साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर निर्माण केलेले साहित्य धूळ खात पडले आहे. आज ग्रंथालयामध्ये न जाता ई-मीडियावरही अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. तीही उपयुक्त आहेत.

वाचन संस्कृती टिकणे काळाची गरज असून सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांनी वाचन करण्याची गरज आहे. वाचनाने माणूस ज्ञानी व संस्कारी बनतो. मानवतेचे शिक्षण आपल्याला या साहित्यातून मिळते. माणूस म्हणून जगण्याचे बळ साहित्य देते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावे, असे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.एम. ए. येल्लुरे यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. ए. डी. पाटील, ग्रंथपाल डॉ. एम. आर. कोंडागुर्ले, सौ. स्नेहा कोलते आदी मान्यवर होते. पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय विभागामार्फत गोल्ड कार्ड देण्यात येते. गोल्ड कार्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी अधिक एक पुस्तक दिले जाते. त्या अंतर्गत समीक्षा पांचाळ, सायराबानू काझी, कलिका जाधव, सज्ञानी घागरे, यश धावडे, कल्पेश माने, अमित पवार, ज्योती कांबळे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गोल्ड कार्ड देण्यात आले.

 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow