खेड : माणी-शेलारवाडी धरणाचे काम ३९ वर्षांनंतरही काम रखडलेल्या अवस्थेत..

Jun 1, 2024 - 14:28
Jun 1, 2024 - 14:31
 0
खेड : माणी-शेलारवाडी धरणाचे काम ३९ वर्षांनंतरही काम रखडलेल्या अवस्थेत..

खेड : पाणी अडवून कोकणचा आर्थिक उत्कर्ष साधण्याचे स्वप्न दाखवत लघु पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून तालुक्यातील माणी-शेलारवाडी येथे धरण उभारण्यास सुरुवात झाली; मात्र ३९ वर्षांनंतरही हे धरण अपूर्णावस्थेत आहे. या धरणासाठी निधीची आवश्यकता असून, हा निधी प्राप्त झाल्यानंतरच धरणाचे काम पूर्ण होऊन ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे. 

काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीत १९८६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी माणी- शेलारवाडी धरणाच्या उभारणीला मंजुरी दिली. यासाठी ५ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला होता. मात्र, विविध कारणांमुळे या धरणाचे काम रखडले. सद्यस्थितीत धरण अपूर्णावस्थेत आहे. या धरणाची लांबी ७२८ मी. व उंची ४२.३९ मी. आहे. धरणाच्या सांडव्याचे काम देखील अर्धवट आहे. धरण प्रकल्पामुळे १६.२३४५ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध होणार होता. मात्र, ३९ वर्षांनंतरही रखडलेल्या धरणात सद्यस्थितीत १६ द.ल.घ.मी. इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

धरणाच्या उभारणीमुळे माणीसह लवेल, सवेणी, हेदली, ऐनवरे, वेरळ या गावांतील १८२१ हेक्टर जमीन पीक क्षेत्राखाली येणार आहे. धरणासाठी लागणाऱ्या १०४ हेक्टर जमिनीचे संपादनदेखील पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, धरणाचे काम रखडल्याने परिसर सुजलाम् सुफलाम् होण्याची शक्यता धुसरच झाली आहे. धरणामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील कायमस्वरुपी निकाली निघण्याची शक्यताही मावळली आहे. परिसरातील २१६ कुटुंबे धरणामुळे बाधित झाली होती. त्यातील ३९ कुटुंबांचे स्वेच्छेने पुनर्वसन करण्यात आले, तर उर्वरित १७७ प्रकल्पबाधितांना मौजे गणवाल व लबेल येथे प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. याठिकाणी नागरी सुविधांचीही कमतरता असल्याचा सूर प्रकल्पग्रस्तांकडून आळवला जात आहे.

५० कोटी निधीची आवश्यकता
धरणाच्या सांडव्याच्या कामासह कालव्याच्या नलिकेचे काम देखील अर्धवट आहे. शासनाकडून किमान ५० कोटी निधी अपेक्षित आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून परिसरातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे; मात्र या प्रश्नी शासनच उदासीन असल्याने ग्रामस्थांच्या आशांवर पाणी फेरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 01/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow