सह्याद्री पट्ट्यात पुन्हा एकदा वृक्षतोड

Aug 5, 2024 - 11:13
Aug 5, 2024 - 15:17
 0
सह्याद्री पट्ट्यात पुन्हा एकदा वृक्षतोड

चिपळूण : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर ५० हजारांचा दंड आकारण्याबाबत घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील प्रामुख्याने चिपळूण परिसरातील लाकूडतोड शेतकरी, व्यापाऱ्यांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन वनमंत्र्यांच्या निर्णयात बदल करण्याचा दिलासा मिळविला. हा दिलासा मिळाल्यानंतर काही दिवसांतच सह्याद्री पट्ट्यात पुन्हा एकदा वृक्षतोडीने जोर पकडल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी, निसर्ग संस्था यांच्याकडून अनेक वेळा संताप आणि नाराजी व्यक्त झाली आहे तर अनेक तक्रारीतून वृक्षतोडीतील लाकडे वन विभागाने पकडून ती अवैध असल्याचे सिद्ध करत संबंधितांवर कारवाई केली आहे.

तरीदेखील अधूनमधून छुप्या पद्धतीने वृक्षतोड सुरू आहे. परिणामी, निसर्गप्रेमींकडून थेट वनमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे. त्यानुसार अखेर वनमंत्र्यांनी अवैध वृक्षतोडीवर बंदी घालण्यासाठी ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचे जाहीर केले. या विरोधात चिपळूण परिसरातील लाकूडतोड शेतकरी संघटनेने संतप्त नाराजी व्यक्त करीत थेट पालकमंत्र्यांकडे धाव घेतली. पालकमंत्र्यांनी देखील या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही काळातच सह्याद्री पट्टयात वृक्षतोड सुरू झाल्याचे उघड होत आहे. सह्याद्री पट्टयात बहुतांश खासगी मालकीची वनक्षेत्रे आहेत. मात्र, सह्याद्री हा व्याघ्र प्रकल्प असल्याने कोअर झोन, बफर झोन अशा विविध स्तरावरील टप्प्यात अवैध वृक्षतोडीला बंदी आहे. या तीन टप्प्यांतील काही क्षेत्र खासगी मालकीचे आहे. तरीदेखील अवैधपणे वृक्षतोड करणे बेकायदेशर असल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्यातील २७३ गावे संरक्षित
जर परवाना घेऊन अधिकृत वृक्षतोड होत असेल तर अनधिकृत वृक्षतोडीच्या दंडाबाबत आक्षेप का? त्याला पालकमंत्र्यांनी दिलासा का दिला? असा सवाल आता निसर्ग व पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे, तर केंद्र शासनाकडून नुकताच अध्यादेश काढून जिल्ह्यातील २७३ गावे संरक्षित करण्यात आली आहेत. पर्यावरण अधिसूचनेनुसार खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. येथे संरक्षित क्षेत्रात वृक्षतोड करण्यास मनाई आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow