राजापुरात शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधांच्या अभावामुळे रुग्णांची परवड

Aug 7, 2024 - 11:10
Aug 7, 2024 - 15:15
 0
राजापुरात शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधांच्या अभावामुळे रुग्णांची परवड

राजापूर : एकीकडे राजापूरवासीयांना सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची स्वप्ने दाखवली जात आहेत. दुसरीकडे मात्र तालुक्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक सेवा सुविधांच्या अभावामुळे रुग्णांची परवड होत आहे. राजापूर ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाचे काम सुरू असल्याने सध्या शवविच्छेदनासाठी ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह ठेवले जात आहेत; मात्र, मृतदेह नेणाऱ्यांना आणि त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी जाणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तेथे पोहोचण्यासाठी यातायात करावी लागत आहे.

ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या या शवविच्छेदन गृहाबाहेर व रस्त्यावर वाढलेली झाडी, रस्त्यावर पसरलेला चिखल यामुळे डॉक्टर आणि कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणी पोहोचावे लागत आहे. राजापूर तालुक्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये, नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४८ आरोग्य उपकेंद्रे आहेत. अनेक ठिकाणी डॉक्टर, कर्मचारी यांची कमतरता आहे.

औषधांचाही अनेक ठिकाणी तुटवडा आहे. तरीही आहे त्याच परिस्थितीत या आरोग्य सेवेचा कारभार हाकला जात आहे. राजापुरात अनेक अपघाती, आत्महत्या, विषबाधा व अन्य कारणांनी होणाऱ्या मृत्युमुळे त्या मृतदेहाचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात करावे लागते. सध्या राजापूर ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे राजापूरपासून सात किमीवर असणाऱ्या ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह शवविच्छेदनासाठी न्यावे लागत आहेत; मात्र, ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवविच्छेदन गृहापर्यंत जाण्याच्या मार्गावर गर्द वाढलेली झाडी आणि रस्त्यावर पसरलेले चिखलाचे साम्राज्य यामुळे तिथपर्यंत पोहोचताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नातेवाईक यांना जीव मुठीत घेऊन रस्ता शोधत जावे लागत आहे. राजापूरकरांना सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल द्याच पण आहे त्या सेवा तरी किमान सुधारा, अशी जनतेची अपेक्षा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow