"माझं मन खूप घाबरलंय, शक्य असतं तर मी..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर साक्षी मलिकने व्यक्त केल्या भावना
नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला वजनाच्या कारणावरून ऑलिम्पिकमधून बाद करण्यात आल्यानंतर क्रीडाप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक दिलेल्या विनेश फोगाटला अंतिम सामन्याआधी अयोग्य ठरवण्यात आल्यानंतर क्रीडा जगतातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.
साक्षी मलिकने एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "माझं मन खूप घाबरलं असून अस्वस्थही आहे. विनेशसोबत जे झालं ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. या ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूसोबत झालेली ही सर्वांत विनाशकारी घटना असेल. विनेश या सगळ्यामुळे कोणत्या अवस्थेतून जात असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. शक्य असतं तर मी माझं ऑलिम्पिक पदक विनेशला दिलं असतं," अशा शब्दांत साक्षीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
उपांत्य लढतीनंतर वजन किंचfत वाढलं असल्याचं लक्षात आल्यानंतर विनेश फोगाट हिने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र आज सकाळी वजन करण्यात आलं तेव्हा तिचं वजन हे निश्चित मर्यादेपेक्षा किंचित अधिक भरलं. त्यामुळे समितीने तिला स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मोठा धक्का विनेशला बसल्याचं सांगण्यात येत आहे.
विनेशला रुग्णालयात केलं दाखल
विनेश फोगाट हिने महिलांच्या कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठत इतिहास रचला होता. तसेच देशासाठी बहुमूल्य असं एक ऑलिम्पिक पदक निश्चित केलं होतं. मात्र आज वजनी गटाच्या मर्यादेपेक्षा किंचित अधिक वजन आढळल्याने विनेशला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं आहे. या निर्णयामुळे विनेशचं हातातोंडाशी आलेलं पदक हुकलं असून, त्याचा मोठा धक्का विनेशला बसला आहे. डिहायड्रेशन होऊन बेशुद्ध झाल्याने विनेश फोगाट हिला पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 07-08-2024
What's Your Reaction?