रत्नागिरीच्या मिनी आर्ट गॅलरीचे १५ ऑगस्टला उद्घाटन : पालकमंत्री उदय सामंत

Aug 8, 2024 - 12:55
Aug 8, 2024 - 12:50
 0
रत्नागिरीच्या मिनी आर्ट गॅलरीचे १५ ऑगस्टला उद्घाटन : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी विकासाच्या आणि पर्यटनच्या दृष्टीने काय काय आहे हे मिनी आर्ट गॅलरीच्या माध्यमातून सांगितले जाणार असून या गॅलरीचे १५ ऑगस्टला उद्‍घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी शहरातील प्रभाग २ येथील सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, परदेशी पर्यटकांसाठी पूरक प्रकल्प रत्नागिरीत सुरू करण्यावर भर आहे. राणीच्या बागेनंतरचा पेंग्विन रत्नागिरीतील प्राणी संग्रहालयात असेल.

रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे; मात्र विकास करताना रत्नागिरी शहरालाही तेवढेच प्राधान्य दिले आहे. काही दिवसांत महाराष्ट्राच्या नकाशात रत्नागिरीचे नाव उजळताना दिसेल. जगातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज रिसर्च सेंटर रत्नागिरीत होणार असून अरबी समुद्रात उभा असेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रत्नागिरीत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने विविध योजना आणल्या. त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. लोकसभेच्या निवडणुकीत खोटा प्रचार करून मुस्लिम आणि दलित बांधवांना भडकवण्यात आले. त्यामुळे विरोधात मतदान झाले. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत देशाचे संविधान बदलले जाणार नाही. कोणत्याही मुस्लिम समाजाला देशाच्या बाहेर काढले जाणार नाही. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम सुरू आहे.

रत्नागिरी शहरातील रस्त्यांना खड्डे आहेत हे नाकारता येत नाही; मात्र झालेला पाऊस याला कारणीभूत आहे. या नैसर्गिक आपत्तीला आपण स्वीकारले पाहिजे. दुसरीकडे रत्नागिरीकरांना काँक्रिटीकरणाचे दिलेले आश्वासन प्रामाणिकपणे पार पाडले असून, त्यातील काही काम पूर्णही झाले आहे, असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, उपजिल्हाप्रमुख राजन शेट्ये, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, उद्योजक भाऊ देसाई, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगरसेवक निमेश नायर, अभिजित दुड्ये उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow