Ratnagiri : जिल्ह्यातील सर्व बंदरांत मासेमारीची रेलचेल..

Aug 8, 2024 - 15:00
Aug 8, 2024 - 15:04
 0
Ratnagiri : जिल्ह्यातील सर्व बंदरांत मासेमारीची रेलचेल..

दापोली : वातावरण स्थिर झाल्यानंतर मासेमारीला आरंभ झाला आहे. सहा दिवसांनंतर आंजर्ले खाडीतील १५० हून अधिक नौका समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. त्यामुळे बंदरात मच्छीमारांची ये-जा सुरू झाल्यामुळे बंदरे गजबजू लागली आहेत. १५ ऑगस्टपर्यंत बहुसंख्य नौका समुद्रावर स्वार होतील आणि हर्णेसह जिल्ह्यातील सर्व बंदरांत मासेमारीची रेलचेल सुरू होईल, असे मच्छीमारांकडून सांगण्यात आले.

मासेमारीला १ अऑगस्टपासून सुरुवात होणार असल्यामुळे ट्रॉलर आणि पारंपरिक मच्छिमारांनी १५ दिवस अगोदर नौकांच्या डागडुजीला सुरवात केली. सुतारकाम, मशिनरीची कामे करण्यासाठी लागणारे मेकॅनिक, नौकाना पेंटिंग करणे आदी कामगारवर्ग कामाला लागले होते, मात्र या सर्व मेहनतीवर वावरणातील बदलांनी पाणी फेरले, पाच दिवसांनी वातावरण निवळू लागले, त्यामुळे ऑगस्टला आंजर्ले खाडीतून नौका मासेमारीसाठी रवाना झाल्या, अमावस्येनंतर उधाणाचा फायदा घेऊन भरतीच्यावेळी नौका खाडीतून बाहेर पडल्या. त्यानंतर सलग दोन दिवस १५० हुन अधिक नौकांनी मासेमारीला आरंभ केला. अमावस्येनंतर समुद्राला पुढे तीन दिवस उधाण असतो. सध्याचे वातावरण मासळी मिळाम्यासाठी पोषक आहे त्यामुळे बहुसंख्य मासेमारी नौका यंदा मासेमारीला जात आहेत. बहुसंख्य मच्छीमार गणपती सणानंतर मासेमारीचा मुहूर्त साधणार आहेत; परंतु मासेमारी चालू होण्याच्यादृ‌ष्टीने अवलंबून असलेले डिझेल, बर्फ कारखाने, हार्डवेअर दुकाने, किराणा मालाची दुकाने सर्व उद्योग बऱ्यापैकी चालू आहेत. पंचक्रोशीतील मोठे बर्फ कारखानेही चालू झाले आहेत. हर्णे बंदर मच्छीमारांच्या तयारीने गजबजून गेले आहे.

बिल्जा मासळीचे दर घसरले
फायबर आणि एक इंजिनच्या छोट्या नौकांनी किनाऱ्याजवळ मासेमारी सुरु केली आहे. त्यांच्या जाळ्यात बिल्जा मासळी लागली होती. त्यामुळे हर्णे बंदरातील आर्थिक उलाढाल सुरू झाली. दोन दिवसांत वीसहून अधिक चारचाकी गाड्या बिल्जा मासळी भरून गोवा, केरळला पाठवण्यात आल्या; पण त्या मासळीला व्यापाऱ्यांकडून किलोला ४० रुपये दर मिळाल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला ७० रुपये किलोला दर मिळाला होता; मात्र लगेचच दर घसरल्यामुळे मच्छीमार नाराज झाले आहेत.

आंजर्ले खाडीतील गाळाचा प्रश्न लवकर सोडवणे गरजेचे आहे. या खाडीतून मासेवारीला नौका समुद्रात नेणे खूपच धोक्याचे आहे. गेल्या दोन दिवसात मच्छीमारानी भरतीची वेळ साधून नौका समुद्रात नेल्या.- अनंत चोगले, मच्छीमार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow