माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला : मनोज जरांगे पाटील

Aug 9, 2024 - 14:24
 0
माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला : मनोज जरांगे पाटील

मुंबई : मराठा आरक्षणासाठी १२ महिने झाले आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. पण आमचे शांततेत सुरू असलेले आंदोलन सरकारला कळत नसेल तर आमचा नाइलाज आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही.

यामुळे निवडणूक लढवायची वेळ आली तर पक्ष काढणार नाही, मात्र अपक्ष उमेदवार उभे करणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. तसेच सगेसोयरेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. तसेच राज्यभरात शांतता रॅली काढून मनोज जरांगे एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करत असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर आता पुढील दिशा काय असेल, आगामी विधानसभा निवडणूक लढवायची का, याबाबत निर्णय घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी एक मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राखीव जागांवरती मराठा आरक्षणास पाठिंबा देणाऱ्या इतर समाजातील उमेदवाराला पाठिंबा देऊ. २९ तारखेला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला

देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात पाच ते सहा गट तयार केले आहेत. ज्यावेळी माणूस कशामध्ये सापडत नाही त्यावेळी तो माणूस बदनाम केला जातो. बदनामीसाठी त्यांनीच एका जातीयवादी पीआयकडून माझ्या गेवराईमधील घरावर नोटीस चिकटवली आहे. माझ्या बदनामीसाठी बोलायला लावणारे राज्यात एकमेव ठिकाण मुंबईतील सागर बंगला आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. नेत्यांची माझ्यावर नाराजी असेल तर मग मराठा समाजाच्या नाराजीचे काय, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रसह राज्यात संपूर्ण मराठा समाज एक झाला आहे. राजकारण्यांनीच मराठा समाजाची विभागणी केली आहे, अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली.

आता केवळ मराठा समाजाची लाट

आता मराठा समाज हुषार झाला आहे. नेत्यांपेक्षा आणि पक्ष मोठे करण्यापेक्षा स्वतःचे कुटुंब मोठे करा याकडे समाजाचा कल आहे. आधी नेत्यांची लाट होती आता मराठा समाजाची लाट आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच दहा टक्के आरक्षण आम्ही मागितले नव्हते. मात्र, तरीही सरकारने दिले, ही सरकारची चूक आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 09-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow