भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत : बच्चू कडू

Sep 19, 2024 - 16:33
 0
भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत : बच्चू कडू

मुंबई : लाडका भाऊ, लाडकी बहीण अशा योजना देण्याऐवजी आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला ४ क्विंटल कांदा, मुख्यमंत्र्यांना १५ क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ.

शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत आहे. असे असताना शेतमालाला हमीभाव मिळत नाही. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन जास्त किंवा कमी झाले तरी समस्यांना तोंड द्यावे लागते. तुम्ही आम्हाला योजना काय देतात. योजना जाहीर करण्याऐवजी आमच्या कांद्याला भाव द्या, अशी जाहीर मागणी बच्चू कडू यांनी केली.

एका सभेत बोलताना बच्चू कडू यांनी महायुती सरकार तसेच काँग्रेसवर जोरदार टीका केली. आमच्याकडे कांदा असल्यावर हस्तक्षेप करत नाही. शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही खासदार, आमदार बोलत नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा पक्ष प्रिय असतो. आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखविणार, तुम्ही आम्हाला रडवले आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत

शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची लढाई गेल्या ७५ वर्षांपासून आपण लढतो आहोत. अजूनही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना मान-सन्मान मिळत नाही. शेतकऱ्यांना अजून आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यामुळे आता ही बदल्याची भावना निर्माण होत आहे. आता येणारी ही निवडणूक बदला घेणारी असेल. कांद्यामुळे आम्हाला ज्यांनी ज्यांनी रडवले मग काँग्रेस असूद्या अन्यथा भाजपा. गेल्या ७५ वर्षात भाजपा आणि काँग्रेसने दोन्ही पक्षांनी राज्य केले. दोघांनीही आमच्या डोळ्यात पाणी काढले. काँग्रेस आणि भाजपाने लुटणारी व्यवस्था निर्माण केली. ही व्यवस्था उखडून फेकण्याचे दिवस आले आहेत, या शब्दांत बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीला एक पर्याय म्हणून आता तिसरी आघाडी केली जात आहे. छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी पुढाकार घेऊन तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भातील एक बैठकही घेण्यात आली. सध्या महाराष्ट्राला अजून एका चांगल्या पर्यायाची गरज आहे. एक सक्षम पर्याय म्हणून तिसरी आघाडी असेल. महाविकास आघाडी आणि महायुती सरकार अपयशी ठरली आहे. मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत तिसऱ्या आघाडीच्या सहभागाविषयी सकारात्मक असल्याचे राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 19-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow