मत्स्य व्यवसाय विकासकडून दाभोळ खाडीत पाहणी

Aug 10, 2024 - 10:27
 0
मत्स्य व्यवसाय विकासकडून दाभोळ खाडीत पाहणी

चिपळूण : दाभोळ खाडीतील मृत माशांप्रकरणी मत्स्य व्यवसाय विभागाकडून बुधवारी खाडीपट्ट्यात पाहणी करण्यात आली. यामध्ये चिपळूण तालुक्यातील केतकीपासून गुहागर तालुक्यातील पेवे, कारूळपर्यंत अनेक ठिकाणी मृत मासे आढळल्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी एस. बी. चव्हाण यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल दिला आहे व या बाबत पाणी व मासे तपासणी करून अहवाल द्यावा, असे पत्र दिले आहे.

दाभोळ खाडी संघर्ष समितीने दोन दिवसांपूर्वी वाशिष्ठी दाभोळ खाडीतील मासे मृत होत असल्याची तक्रार एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व सीईटीपीकडे केली होती. यामध्ये सीईटीपी आणि काही उद्योजकांकडून रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी वाशिष्ठी-दाभोळ खाडीमध्ये पाहणी केली. यामध्ये ठिकठिकाणी मासे मृत झाल्याचे आढळून आले.

या संदर्भात मच्छीमार सहकारी संस्था चिवेली, मत्स्यगंधा मच्छीमार सह. संस्था पेवे, कारूळ यांनीदेखील खाडीतील मासे मृत होत असल्याची तक्रार मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली. या पाहणीत केतकी भोईवाडी ते पेवे आणि कारूळपर्यंत मृत मासे आढळून आले. दरवर्षी जुलैअखेर ते ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हा प्रश्न निर्माण होत असतो. या कालावधीत मासे मृत होऊन त्याचा फटका मच्छीमारांना बसतो. नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी सोडण्यावर कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या पाहणीच्यावेळी सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी चव्हाण यांच्यासमवेत प्रभाकर सैतवडेकर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow