जरांगेंच्या आडून पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण, त्यांनी माझ्या नादी लागू नये, अन्यथा... : राज ठाकरे

Aug 10, 2024 - 14:25
 0
जरांगेंच्या आडून पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण, त्यांनी माझ्या नादी लागू नये, अन्यथा... : राज ठाकरे

मुंबई : "माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तेव्हा मी मनोज जरांगे पाटील यांचं नावही घेतलं नव्हतं. मात्र मुद्दाम माझ्याकडे काही माणसं पाठवून घोषणा देण्यात आल्या.

घोषणाबाजी करणाऱ्या या लोकांचे शरद पवार यांच्यासोबत फोटो आहेत. काल बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच सहभागी होता. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे विधानसभेत मतं मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत. मात्र तुम्हाला जे करायचं ते करा, पण माझ्या नादी लागू नका. नाहीतर माझी पोरं काय करतील हे तुम्हाला समजणारही नाही," असा आक्रमक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणावर हल्लाबोल करताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, "तुमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग असेल तर तुम्ही त्यांच्यावर टीका करा. पण त्यासाठी समाजात कशाला भांडण लावत आहात? शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असं म्हणतो. मतांसाठी या लोकांकडून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे," असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

पत्रकारांवरही आरोप

"मराठवाड्यात जे जातीचं राजकारण सुरू आहे त्यामध्ये काही पत्रकारांचाही समावेश आहे. धारशिवमध्ये जेव्हा माझ्याकडे येऊन काही लोकांनी घोषणा दिल्या तेव्हा त्यांना उसकवणारे काही पत्रकारच होते. कोणत्या पत्रकाराला कुठे कंत्राट मिळालं आहे, कोणाला एमआयडीसीची जागा मिळाली आहे, ही सगळी माहिती माझ्याकडे आली आहे," असा दावा राज यांनी केला आहे.

दरम्यान, "या राजकीय नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, माझं मोहोळ उठलं तर यांना निवडणुकांमध्येही सभाही घेता येणार नाहीत. कारण त्यांच्याकडे प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत," असा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow