खेड : सहाय्यक निबंधकांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे १५ रोजी उपोषण

Aug 13, 2024 - 11:00
Aug 13, 2024 - 12:02
 0
खेड : सहाय्यक निबंधकांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  १५ रोजी उपोषण

खेड : तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयाच्या अंतर्गत गावोगावी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आहेत. त्यामध्ये अनागोंदी कारभार सुरू असून येथील सहायक निबंधक सुनील मोरे हे त्यांना पाठीशी घालत असल्याने यांच्यावर कड़क कारवाई करावी अन्यथा १५ रोजी उपोषण करण्याचा इशारा, वंचित बहुजन आघाडी खेड तर्फे संबंधित सर्व यंत्रणांना निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष गीरीश गमरे, उपाध्यक्ष दत्ताराम वाघे, पदाधिकारी विनोद शिर्के, सुनिल जाधव, विनोद चव्हाण, अरविंद शिर्के यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, तालुक्यातील ग्रामीण भागात विकास सोसायटी मार्फत कर्जाचे वाटप केले जाते परंतु पुरे (खुर्द) येथील श्री. अनंत जाधव हे श्री झोलाई केदार विकास कार्यकारी सेवा विकास सोसायटीचे रितसर सभासद असताना त्याच्या कर्जाचा अर्ज चेअरमन तथा सचिव यांनी फाडून टाकला व त्यांना तुमची लायकी आहे काय? अशी विचारणा करत कर्ज नाकारण्यात आले. अनंत जाधव यांनी माहितीच्या अधिकारात सहाय्यक निबंधक यांच्याकडे संबंधित संस्थेविषयी माहिती मागितली. सहाय्यक निबंधक यांनी समिती स्थापन करून श्री झोलाई केदार विविध कार्यकारी सेवा विकास सोसायटी पुरे (बुद्रुक) या संस्थेची तपासणी केली व अहवालाची प्रत जाधव यांच्या मागणीनुसार देण्यात आली. त्यामध्ये सोसायटीच्या कामकाजात अनियमित आढळल्याचे नमूद करण्यात आले असले तरी त्या नंतर संबंधित संस्थेवर कारवाईची मागणी करून देखील कारवाई न झाल्याने जाधव यांनी १५ ऑगस्ट २०२३, २६ जानेवारी २०२४, १ मे २०२४ रोजी उपोषण देखील केले. 

सहाय्यक निबंधक सुनिल मोरे यांनी त्यांच्या तक्रारींना नस्तीबंद करायचा सपाटा लावला आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे माहितीच्या अधिकार कायद्याखाली सामाजिक कार्यकर्ते दीपक मोहिते यांनी तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा विकास सोसायट्या यांचे ऑडीट रिपोर्ट मागितले होते. मात्र दि. ६ नोव्हेंबर २०२३ पासून आजतागायत सहायक निबंधक सुनील मोरे यांनी सदर माहिती दिली नाही. त्यामुळे मोहिते यांनी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा विकास सोसायटी, नागरिक सहकारी पतसंस्था तसेच परवानाधारक सावकार त्रयस्त शासकीय लेखापरीक्षक यांची नियुक्ती करून तत्काळ फेर शासकीय लेखापरीक्षण करण्याची मागणी सहकार विभागाकडे केली. मात्र ९ ते १० महिने सतत पाठपुरावा करून देखील सहकार कार्यालयने दखल घेतलेली नाही.

खेड तालुक्यातील मांडवे येथील सुरेश तांबे यांनी कर्ज मागणी केल्यानंतर श्री झोलाई केदार विविध कार्यकारी विकास सोसायटीने शेत जमिनीच्या सातबारा वर ८ महिन्यापूर्वी २ लाख रुपयांचा बोजा चढविला आहे. परंतु अद्याप त्यांना कर्जाची रक्कम दिली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow